मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – विक्रोळी रेल्वे स्थानकात एका प्रेमी युगुलांनी गरीब रथ एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केली. प्रेमाला दोन्ही कुटुंबियांचा विरोध असल्याने या दोघांनी जीवन संपविल्याचे बोलले जाते. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एडीआरची नोंद केली आहे. मृत युगुलांच्या पालकांची जबानी नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नितेश महेश तंगडपल्ली हा २० वर्षांचा तरुण भांडुप परिसरात राहतो. याच परिसरात राहणार्या एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. अलीकडेच या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती त्यांच्या पालकांना समजली होती. त्यांच्या प्रेमसंबंधाला विशेषता मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे तिला बाहेर जाण्यास कुटुंबियांनी बंदी घातली होती. ही माहिती नितेशला समजताच तो रविवारी तिच्या घराजवळ गेला होता. नितेश आल्याचे समजताच ती घरातून त्याच्यासोबत पळून गेली होती. ही मुलगी घरात कुठे नसल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी भांडुप पोलिसांत नितेशविरुद्ध मुलीचे अपहरण केल्याची तक्रार केली होती. दुपारी नितेश हा तिच्यासोबत विक्रोळी रेल्वे स्थानकात आला होता.
फलाट क्रमांक चारजवळ असताना या दोघांनी गरीब रथ एक्सप्रेस मेलखाली उडी घेतली होती. त्यात ते दोघेही गंभीररीत जखमी झाले होते. ही माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या दोघांनाही तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉ. रतनसिंह शिंदे यांनी मृत घोषित केले. दोन्ही मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या आत्महत्येची माहिती त्यांच्या पालकांना देण्यात आली होती. पोलीस ठाण्यात आलेल्या दोघांच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती.
या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रार केली नाही. त्यामुळे कुर्ला रेल्वे पोलिसांनी दोन स्वतंत्र एडीआरची नोंद केली होती. या दोघांचे मृतदेह नंतर त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले होते. प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे नितेशने त्याच्या पंधरा वर्षांच्या अल्पवयीन प्रेससीसोबत एक्सप्रेसखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोघांच्या आत्महत्येने भांडुपमधील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.