दिल्ली कोर्टाचे समन्सची माहिती देऊन बोलण्यात गुंतवून गंडा
साडेनऊ लाख रुपये ट्रान्स्फर करुन फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – विविध बँकेत २५ हून अधिक बोगस बँक खाते उघडल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यांत दिल्ली कोर्टाचे समन्सची माहिती देऊन बोलण्यात गुंतवून एका २६ वर्षांच्या तरुणाला दोन अज्ञात ठगांनी गंडा घातल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. शहानिशा करण्यासाठी सुमारे साडेनऊ लाख रुपये सीबीआयच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन या तरुणाची फसवणुक करण्यात आली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून मोबाईलच्या कॉल डिटेल्सवरुन दोन्ही ठगांचा शोध सुरु केला आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही सराईत टोळी असून या टोळीने विविध शहरात असे फसवणुकीचे गुन्हे केल्याचे बोलले जाते.
तन्मय मोहन परुळेकर हा तरुण शिक्षण घेत असून तो बोरिवली परिसरात त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. बुधवारी १५ मेला तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याच्या नावाने दिल्ली उच्च न्यायालयाचे एक समन्स बजाविण्यात आल्याची माहिती दिली. या समन्सविषयी माहिती जाणून घेण्यासाठी त्याला शून्य क्रमांक डायल करण्यास सांगण्यात आले. त्यामुळे त्याने शून्य क्रमांक डायल केल्यानतर त्याच्याशी संजय शर्मा नावाच्या व्यक्तीशी संपर्क झाला होता. त्याने त्याच्या बँक खात्यात २५ लाखांचे बेकायदेशीर व्यवहार झाले आहे, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याचा क्रमांक त्याला सांगितला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सायबर सेल पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे त्याने त्यांच्याशी या गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घ्यावी असे सांगितले. त्यानंतर त्याने त्याचा कॉल सायबर सेलचा अधिकारी असल्याची बतावणी करणार्या एका व्यक्तीशी जोडून दिला. त्याने त्याच्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्या नावाने २५ हून अधिक बोगस बँक खाते उघडण्यात आले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले आहे. त्याची शहानिशा करण्यायसाठी त्याने त्याला एका बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. ते खाते केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीबीआय) आहे. त्यानंतर त्याने त्याला बोलण्यात गुंतवून त्याला बँक खात्यातून साडेनऊ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते.
हा कॉल सुरु असताना त्याला शंका निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार झाले आहेत का याबाबत ऑनलाईन माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याला अशा प्रकारे आतापर्यंत अनेकांची फसवणुक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने तो कॉल बंद केला. तोपर्यंत त्याच्या बँक खात्यातून साडेनऊ लाखांचा व्यवहार झाला होता. त्यामुळे त्याने ही माहिती बोरिवली पोलिसांना सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपींच्या कॉल डिटेल्सची माहिती काढण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.