मुुंबईला अतिरेकी हल्ल्याचा धोका असला तरी सुरक्षेला अधिक प्राधान्य
पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे प्रतिपादन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑगस्ट 2025
मुंबई, – मुंबई शहराला अतिरेकी हल्ल्याचा धोका असला तरी सुरक्षेला आपण अधिक प्राधान्य देणार असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे प्राथमिक लक्ष असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सोमवारी सायंकाळी देवेन भारती यांनी मुंबईची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, वाहतूक समस्या आणि पोलीस दलातील अत्याधुनिक प्रशासकीय बदल अशा विविध विषयांवर चर्चा केली.
सोमवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयातील पत्रकार कक्षेत पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पत्रकारांची भेट घेतली होती. यावेळी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, लखमी गौतम यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी देवेन भारती यांनी मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी असून आजही मुंबईला अतिरेकी हल्ल्याचा धाका आहे. त्यामुळे मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, मुंबईच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगिलते. शहरी नक्षल वादावर बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबई शहरात अर्बन नक्षलवाद्यांचे अस्तिस्त नाकारता येणार नाही. शहरी लक्षल पथक दररोज त्याची देखरेख करते आणि कारवाई करत आहे. गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणाहून एक हजाराहून बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांत मुंबई शहरात धमकीच्या कॉलच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याची मुंबई पोलिसांकडून गंभीर दखल घेण्याताअली असून धमकी आल्यानंतर संबंधित ठिकाणांची कसून तपासणी केली जात आहे. याच प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यांत आतापर्यंत नव्वद टक्के आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुंबईतील गुन्हेगारासह गुन्हेगारीला हाताळण्यास मुंबई पोलीस सज्ज आहे. कॅनडामध्ये कपिल शर्मा याच्या कॅफेवर दोन वेळा गोळीबार झाला होता. त्याची मुंबई पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर कपिल शर्माला योग्य ती सुरक्षा पुरविण्यात आली आहे. मात्र या गोळीबारामागे बिष्णोई किंवा अन्य टोळीबाबत काहीही सांगण्यास त्यांनी नकार दिला.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत सायबर आणि ड्रग्जच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. या गुन्ह्यांना आळा घालणे मुंबई पोलिसांपुढे एक आव्हान आहे. त्यामुळे ड्रग्जच्या गुन्ह्यांना आळा घालणे तसेच सायबर गुन्ह्यांसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. तसेच महिला सुरक्षेकडे मुंबई पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याचे देवेन भारती यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांत सायबर सेल पोलिसांनी चांगली कामगिरी करताना तीनशेहून अधिक कोटीची रक्कम वाचविण्यात यश मिळविले आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी साठ लाखाहून अधिक बँक खाती गोठविली आहे. अनेक सायबर गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे.
मुंबई शहरात सायबर फसवणुकीचे दररोज दोन हजाराहून अधिक कॉल येतात. अशा फसवणुकीपासून सर्वसामान्य नागरिकांनी सावधगिरी बाळगून याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन मुंबई शहरातील मशिदींवर भोंगे हटविण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पोलिसांकडून पालन केले जात आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन पोलिसांनी डीजेवर बंदी घातली आहे. ज्या मंडळाकडून डीजेबाबत उल्लघंन होईल, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर चिंता व्यक्त करताना त्यांनी वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचे उपाय करण्यात येत असल्याचे सांगितले. वाहतूकीची परिस्थिती, भौगोलिक स्थिती आणि शहरात सुरु असलेले कामांमुळे ही वाहतुकीची समस्या निर्माण झाल्याचे सांगून याबाबत मुंबई महानगरपालिकेसोबत चर्चा करुन उपाययोजना केल्या जात आहे. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात लवकरच फेशियल रिकग्नेशन सिस्टीम बसविण्यात येणार आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी तसेच आयुक्तलय अधिक सुरक्षित आणि अद्यावत करसाठी हे बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता पूर्व परवानगीशिवाय मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात प्रवेश मिळणार नाही असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.