३४ क्रेडिट कार्ड घेऊन बँकेला साडेचार कोटीचा गंडा

राजस्थानात पळून गेलेल्या तीन कार्डधारक जेरबंद

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, दि. ६ (प्रतिनिधी) – क्रेडिट कार्ड घेऊन एका खाजगी बँकेला कोट्यवधी रुपयांना गंडा घालणार्‍या एका टोळीचा सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तीन कार्डधारकांना राजस्थानातून पोलिसांनी अटक केली. मुकेश हिरालाल, विशाल चौहाण आणि मयांक पूत्रा देडीया अशी या तिघांची नावे आहेत. या टोळीने आतापर्यंत ३४ क्रेडिट कार्ड घेऊन बँकेला सुमारे सव्वाचार कोटींना गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या टोळीतील इतर कार्डधारक आरोपींचा शोध सुरु असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

यातील तक्रारदार एका खाजगी बँकेत वरिष्ठ मॅनेजर म्हणून काम पाहत असून ते सध्या अंधेरीतील शाखेत कार्यरत आहेत. बॅकेने काही खातेदारांना क्रेडिट कार्ड जारी केले होते. अर्ज करणार्‍या खातेदारांच्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर खातेदारांना कार्ड दिले जात होते. त्यासाठी संबंधित खातेदारांची पात्रता पाहिल्यानंतर त्यांना कार्डवर ठराविक रक्कमेचे लिमिट दिले जात होते. गेल्या काही वर्षांत बँकेने ३४ खातेदारांना क्रेडिट कार्ड दिले होते. त्यांनी कार्डच्या लिमिटपेक्षा अधिक रक्कम वापरली होती, मात्र त्याचे पेमेंट बँकेला केले नाही. त्यांनी मोठ्या प्रमाात अव्हेलेबल क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे दिसून आल्याने बँकेने अशा खातेदारांची माहिती काढली होती. या माहितीत त्यांच्याकडून बँकेला सुमारे साडेचार कोटी रुपये येणे बाकी होते. वारंवार मेल आणि मॅसेज पाठवून त्यांच्याकडून बँकेला काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच बँकेच्या वतीने तक्रारदारांनी सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता शिंदे, उपनिरीक्षक येतरे, तायडे, देसाई, केंजळे, पडळकर यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन यातील काही आरोपी राजस्थान येथे असल्याची पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी जोधपूर शहरातून मुकेश, विशाल आणि मयांक या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर या तिघांनाही अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले. तपासात या तिघांनी त्याचे क्रेडिट कार्ड दुसर्‍या व्यक्तीला वापरण्यासाठी दिले होते. त्यासाठी त्यांना काही ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपीचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page