उत्तरप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना अटक
दोघांकडून दोन देशी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जुलै 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशातून मुंबई शहरात आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या अधिकार्यांनी अटक केली. राजेशकुमार महेंद्रसिंग कुमार ऊर्फ गुड्डूकुमार आणि अमीत सुधीर शर्मा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दोन मोबाईल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. याच शस्त्रांचा मुंबई शहरात गंभीर गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा शस्त्रांची विक्री करणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना चेंबूर परिसरात काहीजण घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने चेंबूर येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, छेडा नगर जंक्शन, जिजामाता भोसले मार्गावरील शिंदेशाही हॉटेलसमोर साध्या वेशात पाळत ठेवली होती. सोमवारी रात्री तिथे दोन तरुण आले होते.
या दोघांची हालचाल संशयास्पद वाटत होती, त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल सापडले. चौकशीत राजेश आणि अमीत ते दोघेही उत्तरप्रदेशच्या बदांयूचे रहिवाशी आहेत. राजेशचा समोसा विक्रीचा व्यवसाय आहे तर अमीत फर्निचर बनविण्याचे काम करतो. ते दोघेही घातक शस्त्रांची मुंबईत विक्रीसाठी आले होते. या शस्त्रांच्या विक्रीतून त्यांना जास्त पैसे मिळतील असे वाटत होते, मात्र घातक शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
या दोघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते घातक शस्त्रे कोणी दिले, मुंबईत या शस्त्रांची ते दोघेही कोणाला विक्री करणार होते, त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.