मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह पाचजणांना अटक
चार देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह, अठरा काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 नोव्हेंबर 2025
मुंबई, – इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह पाचजणांच्या एका टोळीला शुक्रवारी दुपारी वडाळा येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. भैय्यू रामपाल खरे, दशरथ अंबाराम बारुलिया, सुल्तान कैलास बारोलिया, धर्मेंद्र मनफुल भाटी आणि गौरव सुंदरलाल देवडा अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण मध्यप्रदेशचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चार देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह, अठरा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून शनिवारी दुपारी पाचही आरोपींना किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे.
इतर राज्यातून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रांची तस्करी होत असल्याने अशा शस्त्रे तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना वडाळा परिसरात काहीजण मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठांकडून खंडणीविरोधी पथकाला संबंधित आरोपीविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशांनतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय तरळगट्टी, पोलीस निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कदम, विशाल मोहिते, जालिद्र लेंभे, पोलीस हवालदार विजय शेंदरकर, प्रमोद शिके, महेश मुळे, कैलास चौगुले, महेश धादवड, अमोल तोडकर, सुधाकर सांगोळे, पोलीस शिपाई राजाराम मोटे, किरण बनसोडे, जगदीश कोळी, जमील शेख व विशेष कार्य पथकातील पोलीस हवालदार महेंद्र पवार, अमीत चौधरी, पोलीस शिपाई प्रथमेश उतेकर यांनी वडाळा येथील बीपीटी कंटेनर रोड, भारत पेट्रोलियम समोरील गल्ली, जे. के नॉलेज सेंटर रोड परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
दुपारी दोन वाजता तिथे पाचजण आले होते. या सर्वांची हालचाल संशयास्पद वाटत होती. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता या पथकाने पाचही आरोपींना शिताफीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना चार देशी पिस्तूल, मॅगझीन आणि अठरा जिवंत काडतुसे सापडले. चौकशीत त्यांची नावे भैय्यू खरे, दशरथ बारुलिया, सुलतान बारोलिया, धर्मेद्र भाटी आणि गौरव देवडा असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण मध्यप्रदेशचे रहिवाशी असून तेथून ते घातक शस्त्रांची विक्रीसाठी मुंबईत शहरात विक्रीसाठी आले होते. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत रात्री उशिरा पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. शनिवारी दुपारी त्यांना किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. या आरोपींना ते शस्त्रे कोणी दिली, ते शस्त्रे कोणाला देणार होते. त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत. या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला किंवा होणार होता का, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.