मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बोरिवली परिसरात एका विशेष कारवाईदरम्यान गुन्हे शाखेच्या सीबी कंट्रोल युनिटच्या अधिकार्यांनी सुमारे ३१ लाखांच्या भेसळयुक्त मिठाईचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका मिठाई दुकानाचा मालक हिम्मतसिंग मोहनसिंग राजपूत याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी एफडीए अधिकार्यांच्या स्वाधीन केले. ऐन दिवाळीत भेसळयुक्त मिठाई तयार करुन या मिठाईची विक्री करण्याचा हिम्मतसिंग राजपूतचा प्रयत्न होता, मात्र त्यापूर्वीच प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने संबंधित दुकानावर कारवाई करुन भेसळयुक्त मिठाई विक्रीचा पर्दाफाश केला.
दिवाळीत मोठ्या प्रमाणात मिठाईला मागणी असल्याने काही व्यापार्यांकडून भेसळयुक्त मिठाईची विक्री होऊ नये म्हणून वरिष्ठांकडून सर्वच युनिटला सूचना देताना अशा मिठाई विक्रेत्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी अशा विक्रेत्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान बोरिवलीतील दौलतनगर, रोड क्रमांक नऊ परिसरात मॉ आशापुरा स्विट्स नावाचे दुकान असून या दुकानाचा मालक हिम्ततसिंग राजपूत आहे. त्याने एक भाड्याने हॉल घेऊन तिथे मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त मिठाई बनविण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सीबी कंट्रोल युनिटला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत माने, रुपेश दरेकर, पोलीस हवालदार चंद्रकांत वलेकर, महेश नाईक व अन्य पोलीस पथकाने एफडीएच्या अधिकार्यांच्या मदतीने हुंडुजा हॉलमध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे हिम्मतसिंग हा त्याच्या काही कर्मचार्यांच्या मदतीने भेसळयुक्त मिठाई तयार करत असल्याचे दिसून आले. यावेळी घटनास्थळाहून पोलिसांनी ११२३ किलो काजू पावडर, ३८०९ किलो काजू, ३३६९ किलो काजू कातळी आणि ५८ किलो तूप असा ३१ लाख ५ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चौकशीदरम्यान हिम्मतलाल राजपूत हा मिठाई व्यावसायिक असून त्यानेच भेसळयुक्त मिठाई बनविण्यासाठी हुंडाई हॉल दहा दिवसांसाठी दोन लाखांच्या भाड्याने घेतला होता. या ठिकाणी तो त्याच्या कर्मचार्यांसोबत अस्वच्छ पद्धतीने कुजलेले काजू, सुका मेवा आणि भेसळयुक्त पदार्थ मिसळताना रंगेहाथ दिसून आला. त्यामुळे त्याला या अधिकार्यांनी अटक करुन पुढील कारवाईसाठी एफडीए अधिकार्यांच्या स्वाधीन केले. घटनास्थळाहून जप्त केलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.