मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 मार्च 2026
मुंबई, – मुंबई शहरात विक्रीसाठी आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या चरसच्या साठ्यासह दोघांना घाटकोपर युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. किशोर छबन शेडगे आणि राजेश राम गावडे अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी 2 किलो 28 ग्रॅम वजनाचे चरस आणि दोन मोबाईल असा दोन कोटी तीन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रणय मोरे, ओम कामटे व इतर काही आरोपीचा सहभाग उघडकीस आला असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
किशोर शेडगे, प्रणय मोरे आणि राजेश गावडे नावाचे तीन तरुण मुंबई शहरात ड्रग्ज विक्री करत असून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात चरसचा साठा आहे. या चरसची विक्रीसाठी ते सर्वजण विक्रोळी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार विकास होनमाने यांना मिळाली होती. वरिष्ठांना ही माहिती शेअर केल्यानंतर त्यांनी युनिट सातच्या अधिकार्यांना संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर बुधवारी 25 मार्चला सायंकाळी पावणेआठ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे, श्रीकांत कारकर, रामदास कदम, धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, पोलीस हवालदार जोशी, इंगळे, राजेंद्र शिंदे, विकास होनमाने, पोलीस शिपाई अमेय जाधव आदी पथकाने विक्रोळीतील पार्कसाईट, अॅनासिन कंपनीजवळील देव शेट्टी चाळ क्रमांक चारच्या रुम क्रमांक चारच्या किशोर शेडगे याच्या घरी छापा टाकला होता.
यावेळी तिथे असलेल्या किशोर शेडगे आणि राजेश गावडे या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 2 किलो 28 ग्रॅम वजनाचे चरसचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 2 कोटी 2 लाख 80 हजार रुपये इतकी आहे. या चरससह त्याच्याकडील दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. तपासात त्यांना ते चरस प्रणय मोरे आणि ओम कामटे यांनी दिली होती. या चरसची डिलीव्हरीसाठी ते दोघेही बाहेर जात होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
याप्रकरणी राजेंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरुन पार्कसाईट पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर किशोर शेडगे आणि राजेश गावडे या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोघांनाही गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत प्रणय मोरे आणि ओम कामटे यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.