खंडणीसाठी धमकाविणार्या छोटा राजनच्या पाचजणांना अटक
प्रोटेक्शन मनी म्हणून ५५ लाखांची खंडणी वसुली केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – खंडणीसाठी धमकाविणार्या छोटा राजन टोळीशी संबंधित एका कुख्यात गुंडासह त्याच्या चार सहकार्यांना शुक्रवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. गणेश राम सोराडी ऊर्फ डॅनी ऊर्फ दादा, प्रदीप फुलचंद यादव, मनिष रामप्रकाश भारद्वाज, रेमी किश्टू फर्नाडिस आणि शशिकुमार रामदेव यादव अशी या पाचजणांची नावे आहेत. अटकेनंतर या पाचजणांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी विविध खेळण्याच्या नोटांसह सात मोबाईल फोन जप्त केले आहेत.
यातील तक्रारदार वांद्रे येथे राहत असून त्यांचा इंटेरियल आणि ब्रोकरेजचा व्यवसाय आहे. मुंबईसह उपनगरातील जागा विकणे, काही जागांचे पुर्नविकास करणे, जागेसंदर्भातील इतर काम करणे आदी काम करतात. फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांच्याकडे त्यांच्या एका मित्राने प्रॉपटी विक्रीचा प्रपोजल आणला होता. त्याच्या परिचित एक महिला असून तिला तिची प्रॉपटी पंधरा कोटी रुपयांना विक्री करायची होती. त्यासाठी त्याने त्याची मदत मागितली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी प्रॉपटीसाठी चांगल्या व्यक्तीचा शोध सुरु केला होता. एका बिल्डरशी त्यांचा जागेविषयी बोलणी झाली आणि त्यांनी ती जागा विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. याच दरम्यान त्यांना छोटा राजनचा गुंड गणेश सोराडीकडून प्रोटेक्शन मनी म्हणून दहा कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिली जात होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांना तिथे त्यांचा प्रोजेक्टचे काम सुरु करता येणार नाही अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर त्यांनी गणेशसह त्याच्या सहकार्यांना ५५ लाख रुपये दिले होते. तरीही त्यांच्याकडून त्यांना सतत प्रत्यक्ष भेटून तसेच फोनवरुन खंडणीसाठी धमकी दिली जात होती. या धमक्यांना कंटाळून त्यांनी खंडणीविरोधी पथकात तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फसणळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोरकुमार शिंदे यांनी गंभीर दखल घेत खंडणीविरोधी पथकाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध ३०८ (२), ३०८ (४), ३२९, ६१, ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच खंडणीचा हप्ता घेण्यासाठी संबंधित आरोपींना तक्रारदारांनी बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे तिथे आलेल्या गणेश सोराडीसह त्याच्या इतर चार सहकार्यांना प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, पोलीस निरीक्षक अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर लेंभे, पोलीस हवालदार वाजे, तोडकर, पांचाळ, सुर्वे, मुळे, शेंदरकर, डुबल, शिंदे, ननावरे, महिला पोलीस हवालदार थोरात, पोलीस शिपाई साळुंखे यांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर या पाचही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील गणेश आणि प्रदीपने खंडणी स्वरुपात आतापर्यंत ५५ लाख घेतले असून त्यासाठी गणेशने घातक शस्त्रांचा धाक दाखवून तक्रारदारांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. प्रोटेक्शन मनीच्या नावाने या आरोपींकडून त्यांना खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यासाठी त्यांनी कोणी आदेश दिले होते, गणेश हा पूर्वी छोटा राजनचा सहकारी म्हणून काम करत होता. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या संपूर्ण प्रकरणात छोटा राजनचा संबंध आहे का. अटक व पाहिजे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी तक्रारदारासह साक्षीदारांना साईटचे काम करायचे असल्यास प्रोटेक्शन मनी तसेच पैसे दिले नाहीतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे या पाचही आरोपींची पोलिसाकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून त्यांच्याविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.