मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गेल्या आठवड्यात मालाड परिसरात एका आर्मीच्या कर्नलच्या फ्लॅटमध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दिपक कृष्णा धवने आणि विनायक गोपीचंद बाविस्कर अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे एक पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे आणि 480 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले आहेत. अटकेनंतर या तिघांना दिडोंशी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अल्पवयीन मुलाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही घटना 1 नोव्हेंबरला मालाड येथील आर्मी कॅम्प, सीओडी परिसरात घडली होती. याच परिसरात तक्रारदार राहत असून ते आर्मीमध्ये सुभेदार म्हणून कामाला आहे. त्यांचे परिचित कर्नलचा तिथे एक फ्लॅट असून ते सध्या लडाख येथे कर्तव्य बजावत आहे. 1 नोव्हेंबरला कर्नलच्या फ्लॅटमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला होता. त्यांच्या कपाटातील एक पिस्तूल, नऊ काडतुसे, तीन लाखांची आणि चांदीचे दागिने चोरी करुन अज्ञात व्यक्तींनी पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच कर्नलच्या वतीने तक्रारदार सुभेदारांनी दिडोंशी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
कर्नलच्या घरी झालेल्या घरफोडीच्या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैेलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांनी गंभीर दखल स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गवस यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रासकर, समीर मुजावर, युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अजय सावंत, सहाय्यक फौजदार अल्ताफ खान, सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, पोलीस हवालदार कल्पेश सावंत, संतोष राणे, संतोष बने, समृद्धी गोसावी, अनंत मोरे, शैलेश बिचकर, नितीन पवार, विशाल गोमे, विजय पवार, प्रसाद गोरुले, हरिश्चंद्र भोसले, शैलेश सोनावणे, गणेश शिंदे, अर्पिता पडवळ, पोलीस निरीक्षक चंद्रकांत शिरसाठ अरुण छोत्रे, विपुल ढाके यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन दिपक, विनायक व अन्य एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीस गेलेले पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, 480 ग्रॅम चांदीचे दागिने व काही कॅश जप्त केले आहेत. चोरीनंतर ते सर्वजण गोवा येथे गेले होते. तिथे काही दिवस मौजमजा केल्यानंतर ते तिघेही मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.
दिपक आणि विनायक हे दोघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. ते दोघेही मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहतात. तपासात आलेल्या या माहितीनंतर तिन्ही आरोपींना दिडोंशी पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. त्यापैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आले आहे.