हत्येच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील वॉण्टेड आरोपीस अटक

गुन्हे शाखेची कारवाई; ताबा तामिळनाडू पोलिसांकडे

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – तामिळनाडू येथे हत्या करुन मुंबईत पळून आलेल्या एका वॉण्टेड असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीस चेंबूर येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. चिन्न सुब्बाराव अयनार असे २४ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला ट्रॉन्झिंट रिमांडवर तामिळनाडू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. चिन्न अयनार याच्याविरुद्ध तामिळनाडूच्या विविध पोलीस ठाण्यात हत्या, हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे, जबरी चोरीसह गंभीर दुखापत करणे आदी आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूच्या वेल्लोर साऊथ पोलीस ठाण्यात ३०२, ३०७, १४७, १४८, २९४ (बी), ३२४, ५०६ (२) भादवी कलमांतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांत चिन्न अयनार याचा सहभाग होता. मात्र हत्येनंतर तो अटकेच्या भीतीने तामिळनाडू येथून मुंबईत पळून आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो चेंबूर परिसरात वास्तव्यास होता. वेल्लूर, तामिळनाडूच्या हत्येच्या गुन्ह्यांतील एक सराईत आरोपी चेंबूर परिसरात लपला असल्याची माहिती पोलीस हवालदार नागनाथ जाधव यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकाने चेंबूर येथील आरसीएफ, पेट्रोल केमिकल टँकर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. जवळपास तीस ते चाळीस टँकरची पोलिसांनी तपासणी केली होती. यावेळी साध्या वेशातील पोलिसांना पाहताच चिन्न अयनार हा तेथून पळू लागला. पळून जाणार्‍या चिन्नला काही अंतरावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासात चिन्न हा तामिळनाडूचा रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध तामिळनाडूच्या विविध पोलीस ठाण्यात आठहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. हत्येच्या गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. त्यामुळे ही माहिती नंतर तामिळनाडू पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर वेल्लूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आर. कुमार व त्यांची टिम मुंबईत आले होते. अटकेनंतर चिन्न अयनारला हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाच्या आदेशानंतर ट्रान्झिंट रिमांडवर तामिळनाडू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला पुढील चौकशीसाठी तिथे नेण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page