व्यावसायिकाच्या घरातील चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक
महिलेविरुद्ध ४४ गुन्ह्यांची नोंद तर पाच गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – वाशीतील एका व्यावसायिकाच्या घरातून चोरी करुन पळून गेलेल्या मोलकरणीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. वनिता ऊर्फ आशा शैलेंद्र गायकवाड असे या ३८ वर्षीय महिलेचे नाव असून ती चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तिच्याविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात ४४ हून अधिक चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असून तिच्या अटकेने चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर तिला वाशी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
झाकीर अहमदबाबा म्हाते हे ५९ वर्षांचे तक्रारदार वाशी येथील सेक्टर नऊ, प्लॉट क्रमांक ११२, अभिमन्यू सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांच्याकडे वनिता ही मोलकरणी म्हणून काम करत होती. कामाच्या काही दिवसांत तिने घरातील सफाई करताना कपाटातील सुमारे साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर हातसफाई केली होती. चोरीनंतर ती पळून गेली होती. हा प्रकार नंतर झाकीर म्हाते यांच्या लक्षात येताच त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात वनिता गायकवाडविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तिचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा वाशी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. हा तपास सुरु असातनाच वनिता ही आरसीएफ येथील माहुल गाव, म्हाडा कॉलनीत परिसरात लपली असल्याची माहिती युनिट सातच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक काळे, परबळकर, पोलीस हवालदार पवार, बल्लाळ, महिला पोलीस हवालदार तिरोडकर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून वनिता गायकवाड हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान तिनेच झाकीर म्हाते यांच्या घरातून साडेतीन लाखांचे सोन्याचे विविध दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करुन पुढील चौकशीसाठी वाशी पोलिसांकडे सोपविण्यात आले. वनिता ही चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून चोरी करणारी ही एक टोळीच आहे. या गुन्ह्यांत तिचे इतर काही नातेवाईक सहकारी महिला आहे. ही टोळी गरीब असल्याचे सांगून काम मिळवून कामाच्या पहिल्याच दिवशी कपाटातील सर्व मुद्देमाल चोरी करुन पलायन करते. वनिताविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरीच्या ४४ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात जुहू बारा, खार नऊ, वांद्रे पाच, सांताक्रुज चार, वर्सोवा तीन, आंबोली दोन, मरिनड्राईव्ह एक, ओशिवरा दोन, ताडदेव दोन, डी. एन नगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यांचा समावेश आहे. तिच्या अटकेने वाशी, वांद्रे, जुहू आणि वांद्रे पोलीस ठाण्यातील चार चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत तिचा लवकरच संबंधित पोलिसाकडून ताबा घेतला जाणार आहे.