मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 मार्च 2025
मुंबई, – एमबीए-एमएचसीईटीसह इतर राज्यातील विविध शासकीय प्रवेश परिक्षांमध्ये गैरव्यवहार करुन उमेदवाारासह शासनाची दिशाभूल करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे याप्रकरणी चारजणांना दिल्लीतून पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य राज अनिलकुमार, चेतन यादव, अभिषेककुमार श्रीवास्तव आणि अमरीशकुमार सिंग अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच अॅप्पल कंपनीचे पाच मोबाईल फोन, एक अॅप्पल मॅकबुक, एक ब्ल्यूटुथ हेडफोन, 64 जीबीचा एक पेनड्राईव्ह आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या चौघांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
काही दिवसांपूर्वी स्टेट सीईटी सेल मुंबई कार्यालयातून एमबीए आणि एमएचसीईटी परिक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलेल्या उमेदवारांचा डाटा चोरी गेला होता. या चोरीच्या डाटावरुन महाराष्ट्रातील 72 उमेदवाराशी मोबाईलवर संपर्क साधून त्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून प्रसंगी त्यांची टक्केवारी वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. प्रवेशासाठी संबंधित टोळीकडून उमेदवारांकडून पंधरा ते वीस लाखांची मागणी करण्यात आली होती. इतकेच नव्हे प्रसंगी सिस्टीम हॅक करणार असल्याचे सांगून संबंधित उमेदवारासह शासनाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
परिक्षा प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करणारी ही एक टोळीच कार्यरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे स्टेट सीईटी सेलकडून गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत युनिट पाचचे प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नायर यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल चंद्रमोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक धनश्याम नावर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सुनिता भोर, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय बेंडाले, सहाय्यक फौजदार सुजीत घाडगे, पोलीस हवालदार मिलिंद निरभवणे, तानाजी पाटील, पोलीस शिपाई गणेश काळे, सरफरोज मुलानी, प्रमोद पाटील, महिला पोलीस हवालदार धनवंता भोये, महिला पोलीस शिपाई शुभांगी पाटील, सुप्रिया पाटील, पोलीस शिपाई वाघमारे, बागल यांनी तपास सुरु केला होता.
तपासात या टोळीने मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, बिहार, राजस्थानासह इतर राज्यात अनेक उमेदवारांना कॉल केला होता. त्यांना एमबीए-एमएचसीईटी या परिक्षेसाठी टक्केवारी वाढवून कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखविले होते. त्यांच्याकडून काही रक्कम घेतल्याचे उघडकीस आले होते. आरोपींनी संबंधित उमेदवारांना दिल्लीतून ऑडिओ आणि व्हिडीओ केले होते. त्यामुळे गुन्हे शाखेची एक टिम दिल्लीला गेली होती. या पथकाने तांत्रिक माहितीवरुन आदित्य राज, चेतन यादव, अभिषेककुमार श्रीवास्तव आणि अमरीशकुमार सिंग या चौघांना वेगवेगळ्या परिसरातून ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत चारही आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे त्यांना अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. यातील आदित्य व चेतन हे दोघेही दिल्लीतील एनआयटीचे व अमरीशकुमार हा बीएससीचा विद्यार्थी आहे तर अभिषेककुमार हा युपीएससी परिक्षेची तयारी करतो. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.