मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 एप्रिल 2025
मुंबई, – घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या पाचजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अंधेरीतील एका हॉटेलमध्ये कारवाई करुन अटक केली. विकास दिनेश ठाकूर ऊर्फ विकी, सुमीतकुमार मुकेशकुमार दिलावर, देवेंद्र रुपेश सक्सेना, श्रेयस सुरेश यादव आणि विवेककुमार नागेंद्र सहा गुप्ता अशी या पाचजणांची नवे असून ते सर्वजण बिहार, उत्तरप्रदेश आणि हरियाणाचे रहिवाशी आहे. या आरोपींकडून पोलिसांनी सात देशी-विदेशी बनावटीचे पिस्तूल, एकवीस जिवंत काडतुसे, पाच मोबाईल आणि काही कॅश आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींचा बिष्णोई टोळीशी संबंध असल्याचा संशय असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीच्या टार्गेटवर एका बॉलीवूड अभिनेत्यासह व्यावसायिक असल्याचे बोलले जाते, मात्र या वृत्ताला मुंबई पोलिसांकडून दुजोरा मिळू शकला नाही.
गेल्या काही दिवसांत इतर राज्यातून मुंबई शहरात घातक शस्त्रांची विक्री करणार्या काही टोळ्या सक्रिय झाल्या होत्या. त्यामुळे या टोळ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना अंधेरीतील हॉटेलमध्ये काही संशयित आरोपी राहत असून त्यांच्या मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रसाठा असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. सलग दोन दिवस तिथे पाळत ठेवल्यानंतर एका संशयिताल पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर चार सहकार्यांची नावे समोर आली, त्यानंतर या चौघांनाही पोलिसांनी हॉटेलमधून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सात पिस्तूल, एकवीस काडुसे, कॅश आणि मोबाईल जप्त केला आहे.
तपासात ते पाचही आरोपी बिहार, उत्तरप्रदेश आणि हरियाणाचे रहिवाशी होते. काही दिवसांपूर्वीच ते घातक शस्त्रे घेऊन मुंबईत आले होते. या शस्त्रांची त्यांना मुंबई शहरात विक्री करायची होती, मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी घातक शस्त्रांसह अटक केली. त्यामुळे या पाचही आरोपीविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या पाचही आरोपीचा बिष्णोई टोळीशी संबंध आहे का. त्याच्या सांगण्यावरुन त्यांना काही टार्गेट देण्यात आले होते का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यापूर्वी त्यांना घातक शस्त्रांची विक्री केली आहे का याचा पोलीस तपास करत आहे. या टोळीच्या टार्गेटवर बॉलीवूडचा एक अभिनेता आणि एक व्यावसायिक असल्याचे बोलले जाते. मात्र मुंबई पोलिसांकडून या वृत्ताबाबत काहीही माहिती सांगण्यास नकार देण्यात आला. तपास सुरु असल्याने आताच काही सांगणे उचित नसल्याचे एका अधिकार्याने सांगितले.