रॉबरीसह घरफोडीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

अकरा गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखेला यश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 मे 2025
मुंबई, – रॉबरीसह घरफोडीच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शिवा आरमोगन शेट्टी असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या चौकशीतून अलीकडेच झालेल्या रॉबरीसह घरफोडीच्या अकराहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी खारघर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

शिवा शेट्टी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो कांजूरमार्ग, कर्वेनगर, विघ्नहर्ता सोसायटीमध्ये राहत होता. तीन वर्षांपूर्वी त्याला एका गुन्ह्यांत कांजूरमार्ग पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्याला अलीकडेच जामिन मिळाला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच तो पुन्हा रॉबरीसह घरफोडी करु लागला होता. त्याच्याविरुद्ध रॉबरीसह घरफोडी, हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्या राहत्या घरी जाऊन पोलिसांकडून वारंवार तपासणी केली जात होती. मात्र काही दिवसांपासून शिवा हा त्याच्या पत्नीसह पळून गेला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने नवी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना शिवा हा त्याच्या पत्नीसोबत ठाण्यातील कळवा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक राजश्री बाळगी, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल काळे, महेश शेलार, नामदेव परबळकर, सहाय्यक फौजदार दिपक पवार, गुरव, पोलीस हवालदार सुभाष मोरे, अजय बल्लाळ, विनोद शिरापुरी, सचिन गलांडे, विलास राऊत, हर्षल पाटील, प्रमोद शिंदे, पोलीस शिपाई विकास होनमाने, महेश सावंत, जितेंद्र पाटील यांनी कळवा परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून शिवा शेट्टीला शिताफीने अटक केली.

तपासात त्याने जामिनावर बाहेर आल्यानंतर नवी मुंबई, मिरा-भाईंदर, पालघर परिसरात अकराहून अधिक रॉबरीसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याने त्याला पुढील चौकशीसाठी खारघर पोलिसाकडे सोपविण्यात आले. नंतर त्याचा इतर पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page