बससह रेल्वेत चोरी करणार्‍या सराईत गुन्हेगाराला अटक

गर्दीचा फायदा घेऊन चोरी करुन पलायन करत होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – गर्दीचा फायदा घेऊन बससह रेल्वेत चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सुरज निहुरा सिंग असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या गोरखपूरचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून चोरीचे चार मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेनंतर त्याला कुर्ला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बेस्ट आणि रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन एक आरोपी चोरी करत असून चोरीच्या मुद्देमाल विक्रीसाइी चेंबूर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस शिपाई पांचाळ यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकणे, पोलीस उपनिरीक्षक संदीप रहाणे, बेळणेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, सहाय्यक फौजदार देसाई, पोलीस हवालदार तुपे, पोलीस शिपाई पांचाळ, बोधारे, महिला पोलीस शिपाई सरोदे यांनी चेंबूरच्या गोल्फ क्लबजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या सुरज सिंग याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे पोलिसांना चार मोबाईल सापडले,

चौकशीदरम्यान त्याने ते चारही मोबाईल बस आणि रेल्वेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याची कबुली दिली. त्याने अलीकडेच कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे केल्याचे सांगितले. चोरीचे चारही मोबाईल हस्तगत करुन त्याला नंतर कुर्ला रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सुरज हा मूळचा उत्तरप्रदेशच्या गोरखपूर, गोला बाजार, बडहाल गंजचा रहिवाशी आहे. चोरीनंतर मुद्देमालाची विक्री करुन तो उत्तरप्रदेशात जात होता. त्यानंतर तो पुन्हा चोरीसाठी मुंबईत येत होता. त्याच्या चौकशीतून चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page