हत्येच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस जोगेश्वरीतून अटक
गुन्हे शाखेची कारवाई; गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड होता
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – हत्येच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी जोगेश्वरी येथून अटक केली. सुफियान युसूफ शेख असे या २७ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. हत्येनंतर गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेला सुफियान हा जोगेश्वरी येथे स्वतचे नाव आणि अस्तित्व बदलून राहत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
नालासोपारा येथील टाकीपाडा परिसरात सुन्नी गौसिया नावाचे एक मशिद असून या मशिदीच्या जुन्या ट्रस्टचा वाद काढून ३० जानेवारी २०२३ रोजी पाच ते सहाजणांमध्ये वाद झाला होता. याच वादातून तक्रारदारासह मयत मुस्सवीर मोहम्मद अनीस डायस ऊर्फ मच्चूभाई यांच्यावर लाथ्याबुक्यांसह चाकूने प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात मुस्सवीर हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्यावर जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरमयान त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर नालासोपारा पोलिसांनी दंगल घडवून मारामारी करणे आणि हत्येसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात सुफियानचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र हत्येनंतर सुफियान हा पळून गेला होता. गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता.
सुफियान हा जोगेश्वरी येथे राहत असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांत तो गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, गणेश तोडकर, पोलीस हवालदार मोरे, महिला पोलीस शिपाई खाडे यांनी जोगेश्वरी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी सायंकाळी सुफियान हा जोगेश्वरीतील रामगढ विभाग, अंधेरी प्लॉटजवळ आला असता त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद तसेच तो याच गुन्ह्यांत दिड वर्षांपासून वर्षांपासून वॉण्टेड असल्याचे उघडकीस आले. या चौकशीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नालासोपारा पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.