मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 जून 2025
मुंबई, – गांजा तस्करीप्रकरणी दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. सोमेश भिकुलाल मुंगसे ऊर्फ मॅडी आणि बाळू दगडूबा खिल्लारे ऊर्फ बालाजी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही छत्रपती संभाजीनगर आणि जालनाचे रहिवाशी आहे. या कारवाईत पोलिसांनी 56 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक बलेनो कार असा 19 लाख 55 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून आणलेल्या ड्रग्जची मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष माहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना जुहू परिसरात काहीजण गांजाची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती युनिट नऊच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने जुहू परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
शनिवारी रात्री जुहू येथील निर्मलादेवी अरुणकुमार आहुजा रोड, पी. ए म्हात्रे क्रिडा मैदाानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एक बलेनो कारमधून दोनजण उतरले. त्यांच्याकडे चार बॅगा होत्या. त्या बॅगा घेऊन जात असताना या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना सुमारे चौदा लाखांचा 56 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. या गांजासह साडेपाच लाखांची कार असा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी युनिट कार्यालयात आणण्यात आले.
तपासात सोमेश ऊर्फ मॅगी हा डान्सर असून तो छत्रपती संभाजीनगर, तीसगावचा रहिवाशी आहे. त्याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या वालुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणासह लैगिंक अत्याचार व पोक्सो तर तेलंगणाच्या उत्पादन शुल्क पोलीस ठाण्यात 28 किलो गांजा तस्करीचे दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद आहे. बाळू ऊर्फ बालाजी हा लातूरच्या भोकरदनचा रहिवाशी असून मजुरीचे काम करतो.
ते दोघेही गांजाची डिलीव्हरीसाठी जुहू परिसरात आले होते, मात्र डिलीव्हरीपूर्वीच या दोघांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.