प्रिटींग पेपर कंपनीत गंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींना गंडा
कंपनीच्या दोन मुख्य आरोपीसह तिघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 जून 2025
मुंबई, – प्रिटींग पेपरमध्ये गुंतवणुक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबई, नवी मुंबई आणि उत्तरप्रदेशातील प्रयागराज शहरातील अनेक गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक कटातील तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. अंकित दिपककुमार जैन, हेतुल रमेशचंद्र शहा आणि ओमकार शिवशंकर सिंग अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील अंकित आणि हेतुल हे मुख्य आरोपी असून त्यांनी आतापर्यंत गुंंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना 25 ते 30 कोटी रुपयांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांचा तपासासाठी गुन्हे शाखेचे एक विशेष पथक लवकरच उत्तरप्रदेशला जाणार आहे.
अंकित आणि हेतुल हे गोरेगाव परिसरात राहत असून व्यावसायिक आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी गोरेगाव परिसरात ए. जे इंटरप्रायझेस नावाची एक कंपन सुरु केली आहे. ही कंपनी विविध कॉर्पोरेट कंपन्यांना ए:4 साईज पेपर ट्रेडिंग करत असल्याचे सांगून कंपनीत विविध आकर्षक योजना सुरु केल्या आहेत. कंपनीत गुंतवणुक केलस वार्षिक बारा ते अठरा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यासाठी कंपनीने काही एजंटची नियुक्ती केली होती. या एजंटच्या मदतीने अनेक गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती.
मात्र कोणालाही दिलेल्या मुदतीत परतावा देण्यातआला नाही. मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम मागण्यासाठी गेलेल्या गुंतवणुकदारांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली होती. काही दिवसानंतर कंपनीला टाळे लावून अंकित आणि हेतुल हे दोघेही पळून गेले होते. हा प्रकार निदर्शनास येताच गुंतवणुकदारांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी कंपनीच्या संचालक व्यावसायिकासह इतर आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, निशिय मिश्र, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोरकुमार शिंदे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश देताना एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर या पथकाने आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
आरोपींच्या घरासह कार्यालय परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. त्यांची जास्तीत जास्त मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तांत्रिक माहितीनंतर मालमत्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, संतोष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश कन्हेरकर, प्रकाश गवळी, इंद्रजीत शिरसाट, महिला पोलीस उपनिरीक्षक पल्लवी कोतवाल, सहाय्यक फौजदार राऊत, अरुण सावंत, तुषार सावंत, विश्वनाथ पोळ संतोष औटे, अमीत वसावे, प्रमोद कांबळे, अमीत करपाते, पोलीस शिपाई निलेश डोंबाळे, धुळदेव कोळेकर, आदित्य जाधव, महिला पोलीस शिपाई नयना पाटील, रंजना निचिते, पोलीस उपनिरीक्षक पासी, पोलीस हवालदार किरण जगदाळे आदींच्या विशेष पथकाने वेगवेगळ्या परिसरातून अंकित जैन हेतुल शहा आणि ओमकार सिंग या तिघांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत या तिघांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही अटक करुन किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिन्ही आरोपींना बुधवार 25 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात अंकित आणि हेतुल हे दोघेही या कटातील मुख्य आरोपी आहेत. त्यांनीच ए. जे इंटरप्रायझेस नावाची कंपनी सुरु करुन त्यात अनेकांना कॅश आणि सोन्याचे दागिने गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. त्यांना चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केली होती.
या टोळीने मुंबईसह नवी मुंबई, उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे मोठ्या प्रमाणात अनेकांना कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. त्यांच्या या आकर्षक परताव्याला भुलून आतापर्यंत दोनशे ते तीनशेहून अधिक गुंतवणुकदारांनी कंपनीत कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली आहे. फसवणुकीचा हा आकडा 25 ते 30 कोटीपेक्षा अधिक असल्याचे एका अधिकार्याने बोलताना सांगितले. या तिघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेसह दागिन्यांची कुठे विल्हेवाट लावली, कुठे प्रॉपटी खरेदी केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.