ड्रग्ज तस्करासह सहकार्याच्या अपहरणाचा पर्दाफाश
मुंबई, रायगड व उत्तरप्रदेशातून सातजणांच्या टोळीला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जुलै 2025
मुंबई, – एक महिन्यांपूर्वी अंधेरीतील ओशिवरा परिसरातून एका ड्रग्ज तस्करासह त्याच्या प्रॉपटी एजंट सहकार्याचे अपहरणाचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अपहरणासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच सातजणांच्या एका टोळीला मुंबईसह रायगड, उत्तरप्रदेशातून पोलिसांनी अटक केली. ड्रग्जसहीत प्रॉपटीच्या वादातून संबंधित अपहरण झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सतीश कडू, राहुल सावंत, सरवर खान, तौसिक झेंडी, युनूस तेवर पील, मेहताब अली आणि संतोष वाघमारे अशी या सातजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून गुन्ह्यांतील कारसह मोबाईल, डोंगल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यांतील एक आरोपी छोटा शकीलच्या भावाचा सहकारी असल्याने या अपहरणामागे छोटा शकीलच्या सहभाग आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
साजिद इलेक्ट्रीकवाला हा मूळचा गुजरातचा रहिवाशी असून तो ड्रग्ज तस्कर आहे. काही वर्षापूर्वी त्याला कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जसहीत मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली होती. या ड्रग्जच्या व्यवहारातील आर्थिक वादातून तसेच प्रॉपटीवरुन त्याचे आरोपीसोबत वाद झाला होता. काही महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्याला नंतर जामिनावर सोडून देण्यात आले होते. जामिनानंतर तो खटल्याच्या वेळेस नियमित हजर राहत होता. त्यासाठी तो गुजरातहून मुंबईत येत होता. 12 जूनला तो मुंबईत आला होता. यावेळी आरोपींनी त्याला ओशिवरा येथे बोलाविले होते. तिथे आल्यानंतर साजिद हा त्याचा प्रॉपटी एजंट मित्र शब्बीर सिद्धीकी याला भेटला होता. त्यांच्यात चर्चा सुरु असताना तिथे चारजण आले आणि त्यांनी या दोघांचे अपहरण केले होते.
ओशिवरा येथून या दोघांनाही नवी मुंबइत आणण्यात आले. दोन दिवस तिथे राहिल्यानंतर शब्बीरने आरोपींच्या तावडीतून स्वतची सुटका केली होती. या दोन दिवसांत त्यांना आरोपींनी बेदम मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे भीतीपोटी त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र काही दिवस उलटूनही आरोपींनी साजिदची सुटका केली नव्हती. ही माहिती समजताच तो पोलिसांकडे गेला होता. पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांत अपहरणासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या तीन ते चार पथकाची नियुक्ती केली होती. यातील प्रभारी धनश्याम नायर व त्यांच्या पथकातील शामराव पाटील, अफरोज शेख, बिराजदार, सचिन सावंत, निलेश शिर्के, महाजन व अन्य पोलीस पथकाने उत्तरप्रदेशातून तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्या तावडीतून अपहरण झालेल्या साजिदची पोलिसांनी सुटका केली. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी मुंबई आणि रायगड येथून अन्य चार आरोपींना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत सर्वच आरोपींचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करणयात आली होती.
अटकेनंतर या सर्वांना बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात सातही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल केला आहे. त्यात खंडणीसह अपहरण, घातक शस्त्रे बाळगणे, मोक्का कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. ड्रग्ज आणि प्रॉपटीवरुन त्यांचे साजिदसोबत वाद सुरु होता. त्याच्याकडून पैसे उकाळण्याासाठी त्यांनी त्याचे अपहरण केले होते.
गेल्या एक महिन्यांत त्यांनी त्याला वेगवेगळ्या ठिकाणी कोंडून ठेवून बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यांतील एक आरोपी छोटा शकीलच्या भावाचा खास सहकारी आहे. त्यामुळे या कटामागे छोटा शकीलचा सहभाग आहे का, त्याच्याच सांगण्यावरुन साजिदचे अपहरण झाले होते का याचा आता पोलीस तपास करत आहेत.