हरियाणा येथून आणलेल्या घातक शस्त्रांसह पाचजणांना अटक
तीन देशी पिस्तूल, गावठी कट्टा, 51 काडतुसांचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 ऑगस्ट 2025
मुंबई, – हरियाणा येथून मुंबई शहरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आलेल्या पाचजणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. सन्नी नरेशकुमार, रवि अंग्रेज, राहुल पृथ्वीराज, अनुज कुलदिप कुमार आणि आदित्य योगेश कौशिक अशी या पाचजणांची नावे असून ते सर्वजण हरियाणाचे रहिवाशी आहेत. या कारवाईत पोलिसांनी तीन देशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह, एक देशी कट्टा, 51 जिवंत काडतुसे, पाच मोबाईल, साडेसहा हजाराची कॅश, बँकेचे डेबीट कार्ड आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री केली जात होती. या घातक शस्त्रांचा मुंबईत होणार्या विविध गुन्ह्यांत वापर होत असल्याने अशा शस्त्रांची तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना कॉटनग्रीन परिसरात काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल तोडकर यांना मिळाली होती. ही माहिती नंतर अमोल तोडकर यांनी त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण थोरात यांना दिली होती. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेत संबंधित आरोपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश खंडणीविरोधी पथकाला दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण थोरात यांच्यासह त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंद्र लेंभे, पोलीस हवालीदार विपीन कदम, सचिन ननावरे, विनोद पद्मन, निलेश कंद, रोहन सुर्वे, अमोल तोडकर, राजाराम मोटे, पोलीस शिपाई किरण बनसोडे, धुळदेव कोळेकर, मयुकर थोरात कॉटनग्रीन परिसरात साध्या वेषात गस्त सुरु केली होती. दुपारी पावणेचार वाजता सहाय्यक अधिशासी अभियंता कार्यालय, कॉटन डेपोजवळ पोलीस पथक गस्त घालत असताना पोलिसांनी पाच तरुण संशयास्पदरीत्या फिरत असताना दिसून आले. त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी पाचही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
तपासात त्यांची नावे सनी, रवि, राहुल, अनुज आणि आदित्य असल्याचे उघडकीस आले. ते सर्वजण हरियाणाच्या सोनीपत, करनाल, जज्जर जिल्ह्यांतील रहिवाशी आहेत. त्यांच्या अंगझडतीसह बॅगेत तीन देशी बनावटीचे पिस्तूल, एक गावठी कट्टा, 51 जिवंत काडतुसांसह इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चौकशीत ते सर्वजण हरियाणा येथून मुंबई शहरात घातक शस्त्रांची विक्रीसाठी आले होते. मात्र या शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच या पाचजणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. ते घातक शस्त्रे त्यांना कोणी दिली. त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे. जप्त केलेल्या घातक शस्त्रांचा कुठल्या गंभीर गुन्ह्यांत वापर झाला आहे का, या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा आता पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.