प्रेमभंग झालेल्या तरुणीची फसवणुक करणार्या दोघांना अटक
उपायासाठी तरुणीने भामट्यांना सोन्याचे दागिने दिले
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 ऑगस्ट 2025
मुंबई, – प्रेमभंग झालेल्या एका अठरा वर्षांच्या तरुणीला तिचे प्रेम परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून उपायासाठी पैशांसह सोन्याचे दागिने मागणी करुन तिला तिच्याच घरातून सोन्याचे दागिने चोरी करण्यास प्रवृत्त करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी राजस्थानच्या गंगानगर येथून दोन भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. विकास मनोजकुमार मेघवाल आणि मनोज श्यामसुंदर नागपाल अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना तक्रारदार महिलेच्या मुलीने उपायासाठी घरातील सुमारे सोळा लाखांचे सोन्याचे दागिने दिले होते. या दोघांकडून पोलिसांनी तेरा लाखांचे 129 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि तीन लाख अठरा हजार रुपयांची कॅश असा सोळा लाख अठरा हजाराचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीने अघोरी उपायासाठी मुंबईसह हरियाणा आणि दिल्लीतील अनेक तरुणींची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
52 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या अठरा वर्षांच्या मुलीसोबत पायधुनी येथे राहते. तिला एक मुलगा असून तो सध्या दुबईत कामाला आहे. 1 ऑगस्टला तिच्या घरी तिची मुलगी एकटीच होती. यावेळी घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने तिच्या घरातून 129 ग्रॅम वजनाचे सोळा लाख अठरा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच या महिलेने पायधुनी पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे युनिट दोनचे अधिकारी करत होते. तपासादरम्यान तक्रारदार महिलेच्या मुलीचे ऑनलाईन लेक्चर सुरु होते. ती एकटीच घरी होती. तिने दिलेल्या जबानीत विसंगत माहिती येत होती.
हाच धागा पकडून तिची पोलिसांनी कसून चौकशी केली असता तिने तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे तसेच त्यांच्या प्रेमसंबंधाला तिच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यातील भेटीगाठी आणि बोलणे बंद झाले होते. याच दरम्यान तिला सोशल मिडीयावर इरफान कांझी या व्यक्तीचे एक पेज दिसले होते. त्यात खोया हुआ प्यार 24 घंटे मे, लॉस्ट लव्ह बॅक, अधुरा प्यार पाने के तरीके अशा विविध पोस्ट दिसून आले. त्यात एक मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे तिने संबंधित मोबाईलवर कथित मौलवीला संपर्क साधला होता. त्याने तिला प्रेमातील अडथळा दूर करण्यासाठी काही सामान घ्यावे लागतील असे सांगितले. त्यात चांदी मटकी, सोन्याची माशी, दिवा, हात्तातोडी वनस्पती, खिळे आदींचा समावेश होता. तसेच त्याने तिला उपाय करण्यासाठी काही रक्कम ट्रान्स्फर करावी लागेल असे सांगितले.
या उपायासाठी तिला पैशांसह सोन्याच्या दागिन्यांची गरज होती. त्यामुळे तिने त्याला मुंबईत बोलावून स्वतहून ते सोन्याचे दागिने कथित मौलवीला दिले होते. तपासात ही माहिती येताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी राजस्थानच्या गंगापूर येथे राहत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिवलटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, रविंद्र मांजरे, प्रशांत गावडे, पोलीस हवालदार उत्तेकर, पाडवी, बोरसे, थिटमे, पोलीस शिपाई डेरे, हरड, सय्यद, आव्हाड, चव्हाण, महिला पोलीस शिपाई क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक घाटोळ, पोलीस शिपाई शिंदे, कलासने आदीचे एक पथक राजस्थानला पाठविण्यात आले होते. या पथकाने गंगानगर येथून विकास मेघवाल आणि मनोज नागपाल या दोघांना अटक केली.
चौकशीत त्यांनीच तक्रारदाराच्या मुलीला प्रेमभंगावर उपाय करण्यासाठी गोड बोलून तिच्याकडून सोन्याचे दागिने घेतल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांतील सोन्याच्या दागिन्यांसह कॅश असा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या टोळीने मुंबईसह हरियाणा आणि दिल्लीत काही तरुणींकडून पैसे घेऊन त्यांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले. ही टोळी सोशल मिडीयावर बोगस जाहिरात देऊन अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणुक करत होती. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोशल मिडीयावरील अशा बोगस आणि फसव्या पोस्टला तरुणींनी बळी पडू नये असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.