युपीच्या ज्वेलर्स दुकानातील लूटप्रकरणी दोघांना अटक

57 लाखांचा मुद्देमाल घेऊन मुंबईत आल्यानंतर कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑगस्ट 2025
मुंबई, – उत्तरप्रदेशातील मेरठ शहरात असलेल्या एका नामांकित ज्वेलर्स दुकानातील शटर तोडून लाखो रुपयांचे सोन्या-चांदीच्या लूटप्रकरणी दोन आरोपींना बोरिवली येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सौरभ तानाजी साठे आणि मोहन मारुती पवार अशी या दोघांची नावे असून या दोघांकडून पोलिसांनी विविध सोन्याचे दागिने, कच्ची-पक्की चांदी, कॅश असा 57 लाख 46 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. उत्तरप्रदेशातून चोरीनंतर ते दोघेही मुंबईत पळून आले होते, मात्र बोरिवली रेल्वे स्थानकात येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

उत्तरप्रदेशच्या मेरठ शहरात तक्रारदार राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा तिथे एक नामांकित ज्वेलर्स शॉप आहे. याच शॉपमध्ये अलीकडेच चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने शॉपचे शटर तोडून आतील विविध सोन्या-चांदीचे दागिने आणि कॅश घेऊन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच मेरठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील आरोपी चोरीनंतर मुंबई शहरात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर मेरठ पोलिसांनी ही माहिती मुंबई पोलिसांना देऊन संबंधित आरोपींना अटक करण्याची विनंती केली होती.

या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बनकवडे, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड, सचिन गवस, प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, राऊत, अजय सावंत, पोलीस हवालदार सुर्वे, गोवळकर, मेर्‍या, खताते, खांडेकर, लिम्हण, बने, सावंत, राणे, गोमे, शिंदे, भोसले, शिंदे, सहाय्यक फौजदार चव्हाण, खान, पोलीस शिपाई धोत्रे यांनी आरोपींची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना आरोपी बोरिवली येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने बोरिवली येनि सौरभ साठे आणि मोहन पवार या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांनी 48 लाख रुपयांचे 478 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध दागिने, सव्वानऊ लाखांचे चार किलो पक्की चांदी, आठ किलो कच्चे चांदी, वीस हजार रुपयांची कॅश असा 57 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या अटकेची माहिती मेरठ पोलिसांना देण्यात आली आहे. चोरीच्या मुद्देमालासह दोघांचा ताबा मेरठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून दोघांना घेऊन मेरठ पोलीस उत्तरप्रदेशात घेऊन गेले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page