फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत करणार्या टोळीचा पर्दाफाश
बँक खात्यासह सिमकार्ड अॅक्टिव्ह करणार्या बाराजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
22 ऑगस्ट 2025
मुंबई, – सायबर गुन्ह्यांसाठी बँक खात्यासह सिमकार्ड अॅक्टिव्ह करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बाराजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. या टोळीने सायबर ठगांना अनेक बँक खात्यासह सिमकार्डची माहिती पुरविली असून या बँक खात्यात मुंबईसह महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरात सुमारे अकरा कोटीची फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटक आरोपींमध्ये वैभव दिनेश पटेल, सुनिल चंद्रभान पासवान, अमनकुमार सुखीराम गौतम, खुशबू राजन्ना सुंदरजुळा आणि रितेश सतीश बांदेकर या मुख्य आरोपीसह इतर सातजणांचा समावेश आहे. या आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्या इतर सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मुंबई शहरात काहीजण सायबर गुन्ह्यांसाठी सायबर ठगाांना आवश्यक असलेले बँक खाती तसेच सिमकार्ड अॅक्टिव्ह करण्याचे काम करत असून त्यामोबदल्यात सायबर ठगाकडून कमिशन घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी गंभीर दखल घेत युनिट दोनच्या अकिार्यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, प्रभारी पोलीस दिलीप तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, प्रशांत गावडे, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, हेंबाडे, भोर, घाटोळ, सहाय्यक फौजदार निंबाळकर, सावंत, पोलीस हवालदार उत्तेकर, राणे, तळेकर, परब, पाडवी, पवार, बोरसे, थिटमे, पोलीस शिपाई हरड, सय्यद, जाधवर, घरत, आव्हाड, महिला पोलीस हवालदार तांबे, केकाणे, महिला पोलीस शिपाई चव्हाण, प्रियंका क्षीरसागर, पूजा क्षिरसागर, गायकवाड, पोलीस शिपाई चालक कळसाने, शिंदे यांनी संबंधित आरोपींची माहिती काढण्याचा प्रयत्न सुरु केला होता. ही माहिती काढताना या पथकाने कांदिवीतील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी. जी सर्च कन्स्लटन्सी आणि प्रिरीत लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सुरु केलेल्या दोन कंपन्यांच्या कार्यालयात छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या वैभव पटेल, सुनिल पासवान, अमनकुमार गौतम, खुशबू सुंदरजुळा आणि रितेश बांदेकर या पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्यांच्या चौकशीत या दोन्ही कार्यालयातून वेगवेगळ्या बँकेत नवीन बचत आणि चालू खाते उघडण्यात येते. बँकेतून पासबुक, चेकबुक, ईमेल अकाऊंट, त्याचा पासवर्ड, सिमकार्ड कुरिअरमार्फत किंवा बायहॅण्ड आणले जाते. नंतर ते सर्व दस्तावेज सायबर गुन्ह्यांतील सायबर ठगांना फसवणुकीसाठी वापरण्यासाठी दिले जात असल्याचे उघडकीस आले. या कारवाईत पोलिसांनी दोन लॅपटॉप, एक प्रिंटर, पंचवीस मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे पंचवीस पासबुक, तीस चेकबुक, 46 एटीएम कार्ड, स्वाईप मशिन, वेगवेगळ्या कंपनीचे 104 सिमकार्ड जप्त केले. याप्रकरणी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
पोलीस कोठडीत असताना पाचही आरोपींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यात या आरोपींनी बँक खाती आणि सिमकार्ड अॅक्टिव्ह करुन ते सायबर ठगांना पुरवत असल्याचे सांगून त्यासाठी त्यांना प्रत्येक बँक खाती आणि सिमकार्ड अॅक्टिव्हसाठी प्रत्येकी सात ते आठ हजार रुपये मिळत असल्याचे सांगितले. याच बँक खात्याचा सायबर ठग फसवणुकीसाठी वापर करत होते. त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर सात आरोपींची नावे समोर आली होती. त्यानंतर या सातजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडील लॅपटॉपचे विश्लेषण केले असता आतापर्यंत 943 पैकी 181 बँक खात्याचा वापर फसवणुकीसाठी झाला होता.
याबाबत सायबर नियंत्रण कक्ष, हेल्पलाईन क्रमांक 1930 या क्रमांकावर डिजीटल अरेस्ट, ऑनलाईन शॉपिंग, शेअर ट्रेडिंगसाठी अनेकांना गंडा घालून त्यांना विविध बँक खात्यात पैसे पाठविण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. त्यापैकी 339 बँक खात्याची तक्रारी प्राप्त झाले असून सोळापैकी चौदा गुन्हे फक्त मुंबईत आहेत. उर्वरित महाराष्ट्रात 46 तक्रारीपैकी बारा, इतर राज्यातील 277 तक्रारीपैकी 33 हून अधिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईतील फसवणुकीच्या गुन्ह्यांत चौदा गुन्ह्यांत 1 कोटी 67 लाख 44 हजार 949 तर उर्वरित महाराष्ट्रातील बारा गुन्ह्यांत 10 कोटी 57 लाख 32 हजार 791 रुपयांची तर संपूर्ण भारतातून एकूण 60 कोटी 82 लाख 75 हजार 026 रुपयांची तक्रारदारांची फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अटक आरोपी सायबर ठगांना बँक खाती आणि सिमकार्ड अॅक्टिव्ह करुन देऊन त्यांच्याकडून कमिशन म्हणून लाखो रुपये घेत होते. याच गुन्ह्यांत काही आरोपी पोलीस तर काहीजण न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्यांच्या इतर सहकार्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी मुंबईसह इतर शहरात जाऊन तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगतले.