मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
24 ऑगस्ट 2025
मुंबई, – सुमारे 21 लाखांच्या हेरॉईनसह चारजणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. मोहम्मद नौशाद नजीर सलमानी, विनोद संतोष धनराळे ऊर्फ अन्या, शंकर तुळशीराम भर ऊर्फ बोल्टा आणि शाह मोहम्मद हनीफ शेख अशी या चौघांची नावे आहेत. यातील विनोद एका खाजगी कंपनीत डिलीव्हरी बॉयचे काम करत असून ड्रग्ज तस्करीसाठी त्याचाच वापर होत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर या चौघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जोगेश्वरीतील ओशिवरा परिसरात काहीजण हेरॉईनची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम यादव, गणेश तोडकर, रौफ, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, पोलीस हवालदार जाधव, ठोेंबरे, पोलीस शिपाई डफळे, परब, निर्मळे, अनिकेत निकम, चव्हाण यांनी तिथे साध्या वेशात गस्त सुरु केली होती.
शनिवारी रात्री साडेदहा वाजता ओशिवरा येथील ऑफ लिंक रोड, सिटी इंटरनॅशनल स्कूलसमोर चारजणांची एक टोळी परिसरात संशयास्पदरीत्या फिरत होती. त्यामुळे या चौघांनाही पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 47 ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा सापडला. या हेरॉईनची किंमत 21 लाख 50 हजार रुपये इतकी होती. तपासात ते चौघेही हेरॉईनची डिलीव्हरीसाठी आले होते, मात्र हेरॉईनची डिलीव्हरी करण्यापूर्वीच या चौघांनाही पोलिसांनी अटक केली.
यातील मोहम्मद नौशाद, विनोद धनराळे आणि शाह मोहम्मद हे तिघेही जोगेश्वरी तर शंकर भर हा गोरेगाव येथे राहतो. मोहम्मद नौशाद हा सलूनमध्ये, शंकर भर हा वॉर्डबॉय तर शाह मोहम्मदचे भंगार दुकान आहे. विशाल हा खाजगी कंपनीत डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला होता. डिलीव्हरी बॉय असल्याने त्याच्यावर कोणावर संशय येत नसल्याने त्याला इतर तिघांनी ड्रग्जच्या डिलीव्हरीसाठी तयार केले होते.
या चारही आरोपीविरुद्ध नंतर एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर या चारही आरोपींना रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांना हेरॉईन कोणी दिले, ते कोणाला देण्यासाठी आले होते, त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.