नौदलातील रायफल-मॅगझीन चोरी करणार्‍या दोन बंधूंना अटक

तेलंगाणा येथून गुन्हे शाखेची कारवाई; रायफल-काडतुसे हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
10 सप्टेंबर 2025
मुंबई, – गणपती विसर्जनाच्या दिवशी दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील नेव्हीनगर, एपी टॉवरमधील नौदलाच्या संत्री चौकातून झालेल्या रायफल-मॅगझीन चोरीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाला यश आले आहे. याप्रकरणी तेलंगणाच्या नक्षलप्रभावित क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या असिफाबादच्या एलगापल्ली गावातून दोन आरोपींना अटक केली. राकेश रमेश दुबला आणि उमेश रमेश दुबला अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सख्खे बंधू असून ते दोघेही तेलंगणाचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीची इन्सास रायफलसह तीन मॅगझीन आणि चाळीस जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. अटकेनंतर दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे. रायफलसह काडतुसे कोणी करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरुन हा गुन्हा केला आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

6 सप्टेंबरला मुंबई शहरात गणपती विसर्जन असल्याने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. त्याच दिवशी सायंकाळी पावणेआठ वाजता नेव्हीनगर, एपी टॉवरजवळील संत्री चौकात नौदलाचा गणवेश घातलेला एक तरुण आला. त्याने तिथे कर्तव्यावर असलेल्या अग्निविराला रिलीफ करुन त्याच्याकडील मॅगझीन आणि जिवंत काडतुसे स्वतच्या ताब्यात घेतली होती. हॉस्टेलला जाताना या अग्निवीराला त्याचे घड्याळ तिथे विसरल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो तिथे गेला होता. यावेळी त्याला रिलीफ देण्यासाठी आलेला तरुण तिथे दिसून आला. तिथे रायफल, मॅगझीन आणि चाळीस जिवंत काडतुसे नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच ही माहिती त्याने त्याच्या वरिष्ठांना दिली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन रायफलसह मॅगझीन आणि जिवंत काडतुसांची चोरी केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे नौदलाच्या वतीने कफ परेड पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला होता.

हा गुन्हा नंतर कफ परेड पोलिसांकडून गुन्हे शाखेत वर्ग करण्यात आला होता. त्याचा तपास गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे आहे. या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेसह राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवादी विरोधी पथकाकडून संमातर तपास सुरु होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यांत दोन आरोपींचा सहभाग उघडकीस आला होता. ते दोघेही चोरीनंतर कफ परेड येथून कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आले होते. तेथून ते दोघेही ट्रेन पकडून तेलंगणा येथे गेले होते.

तपासात आलेल्या या माहितीनंतर गुन्हे शाखेची एक टिम तेलंगणा येथे रवाना झाली होती. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन राकेश आणि उमेश या दोन्ही बंधूंना त्यांच्याच एलगापल्ली गावातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेली रायफलसह तीन मॅगझीन आणि चाळीस जिवंत काडतुसे जप्त केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

यातील राकेश हा नौदलात कामाला असून त्याने यापूर्वी मुंबई शहरात काम केले होते. सध्या त्याची नियुक्ती केरळ शहरात आहे. उमेशचा त्याच्याच गावी रेशनिंग दुकान आहे. तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता. चोरीच्या एक दिवसांपूर्वी राकेश हा मुंबईत आला होता. दुसर्‍या दिवशी त्याचा भाऊ उमेश मुंबईत आला. चोरीसाठी त्यांनी बोगस नौदलाचे ओळखपत्र बनविले होते. या ओळखपत्राच्या मदतीने राकेश हा नौदलातील संत्री चौकीत गेला होता.

नौदलात काम करत असल्याने त्यांच्या कामाची पद्धत माहित होती. त्याने तिथे उपस्थित अग्निविराला रिलीव्ह करुन त्याच्याकडील रायफल, मॅगझीन आणि जिवंत काडतुसे घेतली. त्यानंतर त्याने ते रायफल, मॅगझीन आणि काडतुसे नौदलाच्या बाहेर उभ्या असलेल्या उमेशला दिले. काही वेळानंतर तोदेखील बाहेर आला. त्यानंतर ते दोघेही तेथून पळून गेले होते. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रांची चोरी करणे, घातक शस्त्रे बाळगणे आदी कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या चोरीमागे त्यांचा काय उद्देश होता याचा खुलासा झाला नाही. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग आहे का, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरुन ही चोरी केली होती का याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page