आठ महिन्यांपूर्वी बांगलादेशला पाठविलेल्या महिलेस अटक
जंगलाच्या मार्गाने पुन्हा भारतात प्रवेश केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 डिसेंबर 2025
मुंबई, – मुंबई शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्याास केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर एप्रिल महिन्यांत बांगलादेशात पाठविलेल्या एका महिलेला मंगळवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अॅण्टॉप हिल परिसरातून अटक केली. आयशा ऊर्फ सोनिया जहाँगीर शेख असे या 27 वर्षीय आरोपी बांगलादेशी नागरिक महिलेचे नाव असून तिने जंगलाच्या मार्गाने पुन्हा भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याने अशा नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच अॅण्टॉप हिल परिसरात काही बांगलादेशी नागरिक कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय घुसखोरीच्या मार्गाने प्रवेश करुन वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या एका विशेष तिथे साध्या वेशात पाळत ठेवून संशयित बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. यावेळी पोलिसांनी एका रुममध्ये छापा टाकला होता.
या रुममध्ये आयशा शेख ही महिला राहत होती. तिच्याकडे चौकशीदरम्यान ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. एप्रिल 2025 रोजी तिला चुन्नाभट्टी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक असल्याने भारतात हद्दपारीची कारवाई केली होती. त्यानंतर तिला बांगलादेशात पाठविण्यात आले होते. मात्र काही दिवस बांगलादेशात राहिल्यानंतर ती पुन्हा जंगलाच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन आली होती. भारतात आल्यानंतर ती मुंबईत आली आणि अॅण्टॉप हिल परिसरात भाड्याच्या रुममध्ये राहू लागली. तिथेच राहत असताना तिने घरकामाची नोकरी मिळविली होती.
चौकशीत आलेल्या माहितीनंतर तिला पोलिसांनी पुन्हा अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल हस्तगत केले आहेत. ती मूळची बांगलादेशातील शौरीयतपूर, चारबगा, शकीपूरची रहिवाशी आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.