शेअरमार्केटमध्ये भरघोस नफा मिळवून देतो सांगून अनेकांना गंडा

५०० हून अधिक लोकांची फसवणुक दोनशे कोटींची फसवणुक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ जुलै २०२४
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देतो असे सांगून अनेकांना गंडा घालून पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी मध्यप्रदेशातून अटक केली. आशिष दिनेशकुमार शहा असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी १ कोटी ४२ लाखांचे १९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २५ लाखांची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आशिष शहाने आतापर्यंत मुंबईसह मिरा-भाईंदर, तामिळनाडू येथे ४०० ते ५०० लोकांची सुमारे दोनशे कोटीची फसवणुक केल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी सांगितले.

यातील तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांची आशिष शहाशी ओळख झाली होती. त्याने त्याची सेबी रजिस्टर्ड खाजगी कंपनी असून ही कंपनीत शेअरमार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुक करते. या गुंतवणुकीवर कंपनीने अनेकांना चांगला नफा मिळवून दिला आहे. याच पैशांतून त्याने ऑफिस, फ्लॅट, वाहन आणि सोने खरेदी केले होते. गुंतवणुकीवर वर्षांला ८४ टक्के परवाता देतो असे सांगून त्याने त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आमिषाला बळी पडून या व्यावसायिकाने त्याच्याकडे सुमारे अकरा कोटी शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने परताव्यासह मूळ न देता त्यांची फसवणुक केली होती. अंधेरीतील वर्सोवा येथील फ्लॅट बंद करुन आशिष शहा हा पळून गेला होता. चौकशीदरम्यान त्याने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे तक्रारदार व्यावसायिकाच्या लक्षात आले होते. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आशिष शहाविरुद्ध पोलिसांनी ४०६, ४०९, ४२० भादवी सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदाराच्या अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत प्रॉपटी सेलसह खंडणीविरोधी पथकाला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपटी सेलचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई, पोलीस निरीक्षक प्रविण मोहिते, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरुण थोरात, एसआयटीचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, पोलीस हवालदार अरुण सावंत, चिंतामण इरनक, तुषार सावंत, अशोक शिंदे, सचिन ननावरे, पोलीस शिपाई मयुर थोरात यांनी तपास सुरु केला होता.

तपासात फसवणुकीनंतर आशिष शहा हा गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता, तो सतत त्याच्या वास्तव्याची जागा बदलत होता. काही दिवसांपासून तो मध्यप्रदेशात राहत असल्याची माहिती मिळताचया पथकाने तिथे त्याच्या अटकेसाठी फिल्डींग लावली होती. तिथे काही दिवस पाळत ठेवून अखेर आशिष शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच तक्रारदार व्यावसायिकाला शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास भरघोस नफा मिळवून देतो असे सांगून त्यांची सुमारे अकरा कोटीची फसवणुक केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून १९९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपयांची कॅश असा १ कोटी ६७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला शनिवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंत पोलीस तपासात आशिष शहा अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने मुंबईसह मिरा-भाईंदर, तामिळनाडू येथे अनेकांना चांगला परतावा देतो असे सांगून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते. साधारण पाचशेहून अधिक लोकांकडून त्याने दोनशे कोटी रुपये घेऊन त्यांना कुठलाही परतावा न देता त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तामिळनाडू येथे त्याच्याविरुद्ध अशाच अपहारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. त्याने फसवणुक केलेली रक्कम कुठे गुंतवणुक केली आहे, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्याने आतापर्यंत किती लोकांकडून किती रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली आहे याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page