आयएमईआय बदलून चोरीच्या मोबाईलची विक्री

पाचजणांच्या टोळीचा पर्दाफाश; १६२ मोबाईल जप्त

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ जुलै २०२४
मुंबई, – मुंबईसह देशभरातून चोरी झालेले मोबाईल संबंधित आरोपींकडून स्वस्तात विकत घेऊन या मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलून त्याची विक्री करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. सोमवारी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील एका रुमसह मोबाईल शॉपमध्ये कारवाई करुन पोलिसांनी मुख्य आरोपीसह पाचजणांना अटक केली. आसिफ अब्दुल गफार शहा, मोहम्मद तौसिफ अयुब सिद्धीकी, मोहम्मद मेराज अनिस अहमद शेख, मोहम्मद रजा अनिस अहमद शेख आणि मोहम्मद जहॉंगीर मोहम्मद जाहिद अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी विविध कंपनीचे १६२ चोरीचे मोबाईल आणि एक लॅपटॉप असा १५ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई शहरात चोरीचे मोबाईलचे आयएमईआय क्रमांक बदलून अशा मोबाईलची विक्री करणारी एक टोळी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या टोळीची जास्तीत जास्त माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. यावेळी आसिफ शहा हा तरुण गोवंडी परिसरात राहत असून तोच त्याच्या सहकार्‍याच्या मदतीने अशा प्रकारे चोरीच्या मोबाईलची विक्री करत असल्याची माहिती युनिट सहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या अधिकार्‍यांनी सोमवारी २९ जुलैला गोवंडीतील शिवाजीनगर, शहनाई हॉलजवळील फुरकानिया मशिद, कमला रामन नगरच्या रुम क्रमांक सहामध्ये छापा टाकला होता. या छाप्यात आसिफसह त्याचे तीन सहकारी मोहम्मद तौसिफ, मोहम्मद मेराज आणि मोहम्मद रजा या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडतीदरम्यान पोलिसांनी ८७ चोरीचे मोबाईल आणि कॅश असा सव्वानऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

चौकशीदरम्यान आसिफ शहा याचे एक मोबाईल दुरुस्तीचे दुकान असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्या दुकानात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी तिथे असलेल्या मोहम्मद जहॉंगीरला पोलिसांनी ताब्यात घेतले. या दुकानातून पोलिसांनी ७५ मोबाईल, एक लॅपटॉप असा ६ लाख ६४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी १६२ चोरीचे मोबाईल आणि एक लॅपटॉप असा १५ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. आसिफसह पाचही आरोपींची पोलिसांनी चौकशी केली असता ही टोळी मुंबईसह देशभरातून चोरी, स्चॅनिंग, पिक पॉकेटिंग केलेले चोरीचे मोबाईल स्वस्तात संबंधित आरोपीकडून विकत घेत होते. त्यानंतर या मोबाईलचे मोहम्मद जहॉंगीर हा लॅपटॉपच्या मदतीने आयएमईआय क्रमांक बदलत होता. याच मोबाईलची आसिफ हा त्याच्या दुकानातून विक्री करत होता. गेल्या काही महिन्यांपासून या टोळीने मोठ्या प्रमाणात चोरीच्या मोबाईलची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

तपासात आलेल्या या माहितीनंतर या पाचही आरोपींविरुद्ध पोलिसांनी ३०३ (२), ३१७ (२), (४), ३१८ (४), ३३६ (२), (३), ३४० (२), ६१ (२) भारतीय न्यास सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सर्वांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु असून या पाचही आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांत इतर कोणी सहकारी आहेत, त्यांनी चोरीचे मोबाईल कोणाकडून खरेदी केले होते, चोरीच्या मोबाईलची कोणाला विक्री केली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page