मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ ऑगस्ट २०२४
मुंबई, – दुबईचे दिराम करन्सी देण्याची बतावणी एका चहा विक्रेत्याची फसवणुकप्रकरणी अटक केल्यानंतर पोलीस लॉकअपमध्ये नेताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या मोहम्मद फायक इसहार हुसैन या ३० वर्षांच्या आरोपीला काही तासांत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने राजस्थानच्या कोटा शहरातून अटक केली. त्याच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा राजस्थानातून मुंबईत आणल्यानंतर त्याला डी. एन नगर पोलिसांच्या स्वाधीन दिले जाणार आहे.
मुसा सिंकदर नागोरी हे गोरेगाव येथे राहत असून त्यांचा नागोरी नावाने चहा विक्रीचा व्यवसाय आहे. १ डिसेंबर २०२३ रोजी त्यांच्या चहाच्या दुकानात मोहम्मद शार्दुल नाव सांगणारा तरुण आला होता. त्याने तो कपड्याच्या कारखान्यात कामाला असून त्याच्या परिचित महिलेकडे अडीच लाखांचे दुबईचे करन्सी आहेत. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्याने त्यांना शंभर रुपयांचे दिराम दाखविले. अडीच लाखांचे करन्सी घेतल्यास त्यांना ५० हजार रुपयांचे कमिशन मिळेल असे सांगून त्याने त्यांना दुबईचे करन्सी घेण्यास प्रवृत्त केले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ते करन्सी घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे १४ डिसेंबरला मुसा नागोरी हे त्यांचा मुलगा हसन नागोरीसोबत अंधेरीतील गावदेवी डोंगरजवळ आले होते. यावेळी मोहम्मद शार्दुलसोबत एक महिला होती. त्यांनी त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांची कॅश घेऊन त्यांना दुबईचे करनसी दिले होते. काही अंतर गेल्यानंतर त्यांच्या मुलाने करन्सी बघितली असता त्यात न्यूज पेपर गुंडाळून भरुन ठेवले होते. त्यामुळे ते पिता-पूत्र पुन्हा गावदेवी डोंगर परिसरात आले. त्यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोघेही कुठेही सापडले नाही.
दिराम देण्याचे आमिष दाखवून या दोघांनी त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे मुसा नागोरी यांनी डी. एन नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच मोहम्मद फायक इसहार शेख या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या अधिकार्यांनी कांदिवलीतील लालजीपाडा परिसरातून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली होती. त्यामुळे त्याला पुढील चौकशीसाठी डी. एन नगर पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्याला अंधेरीतील पोलीस लॉकअपमध्ये नेण्यात येत होते. यावेळी तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला होता. त्याचा पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. त्यामुळे डी. एन नगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला आरोपीच्या अटकेचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन मोहम्मद फायक हा राजस्थानला पळून गेल्याची माहिती दया नायक यांना मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेच्या युनिट नऊच्या अधिकार्यांनी राजस्थानच्या कोटा शहरातून बुधवारी मोहम्मद फायक याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार आहे. त्यानंतर त्याला डी. एन नगर पोलिसांकडे सोपविले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले.