विविध गुन्ह्यांतील आरोपींना जामिन मिळवून देणार्या टोळीचा पर्दाफाश
पाचजणांना अटक व कोठडी; बोगस दस्तावेजाचा साठा हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ एप्रिल २०२४
मुंबई, – विविध गुन्ह्यांत कारागृहात असलेल्या आरोपींना बोगस दस्तावेज सादर करुन जामिन मिळवून देणार्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पाचजणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून बोगस दस्तावेज बनविणार्या साहित्यासह इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अमीत नारायण गिजे, बंडू वामन कोरडे, अहमद कासिम शेख, संजीव सोहनलाल गुप्ता आणि उमेश अर्जुन कावले अशी या पाचजणांची नावे आहेत. या आरोपींनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगड येथील विविध कारागृहातील आरोपींना बोगस दस्तावेज सादर करुन जामिन मिळवून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मानखुर्द परिसरात बोगस दस्तावेज कोर्टात सादर करुन विविध गुन्ह्यांत कारागृहात असलेल्या आरोपींना जामिन मिळवून देणारी एक टोळी मानखुर्द परिसरात कार्यरत असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे यांना मिळाली होती. या माहितीचे गांभीर्य लक्षात येताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, हनंमत ननावरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गावडे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुठे, नितीन सावंत, विनयकुमार सकपाळ, प्रकाश आव्हाड, नंदकुमार बेळणेकर, संदीप रहाणे, महिला पोलीस उपनिरीक्षक माशेरे, सहाय्यक फौजदार महादेव कुरडे, सुहास देसाई, पोलीस हवालदार निलेश पारकर, वसंत डाळे, नितीन तुपे, अंकुश वानखेडे, विजय भिलारे, विद्यानंद शिंदे, गायकवाड, दिपक मोरे, पोलीस शिपाई सुरेश घेरडे, माळवेकर, संभाजी कोळेकर, महिला पोलीस शिपाई संगीता अभंग, भाग्यश्री सुतार, पोलीस शिपाई कृष्णा पवार, युवराज पाटील यांनी या टोळीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना या पथकाने मानखुर्द येथील महात्मा फुले नगरातील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून अमीत गिजे आणि बंडू कोरकडे या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अहमद शेख याला चेंबूर येथील छेडानगर, संजीव गुप्ता याला ठाण्याच्या भिवंडी तर उमेश कावले याला कल्याण येथून ताब्यात घेतले.
या कारवाईत पोलिसांनी विविध आरोपींच्या जामिनासाठी लागणारे वेगवेगळ्या नावाचे जामिनदारांचे बोगस कागदपत्रे उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड, वेतन स्लीप, बँक स्टेटमेंट, रेशनकार्ड, लॅपटॉप, विविध शासकीय आणि खाजगी कार्यालयातील रबरी स्टॅम्प मारलेले बोगस कागदपत्रांचा साठा जप्त केला आहे. विविध गुन्ह्यांत कारागृहात असलेल्या आरोपींना जामिन मिळाल्यानंतर त्यांना लायक जामिनदार तसेच कागदत्रांसाठी ही टोळी मदत करत होती. बोगस व्यक्तींना जामिनदार म्हणून हजर करुन त्यांच्या बोगस दस्तावेजाच्या मदतीने जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. याकामी आरोपीसह त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या ऐपतीप्रमाणे आर्थिक मोबदला घेतला जात होता. या टोळीने मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि रायगड येथील विविध गुन्ह्यांतील आरोपींना बोगस दस्तावेजाच्या मदतीने जामिन मिळवून देण्यास मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
तपासात ही माहिती उघडकीस येताच या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध मानखुर्द पोलीस ठाण्यात ४२०, ४६५ ४६७, ४६८, ४७१, ४७३, ४७४, ४७६, १२० ब भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यांचा तपास युनिट सहाकडे वर्ग करण्यात आला आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची सध्या पोलिसाकडून कसून चौकशी सुरु आहे. या टोळीने आतापर्यंत किती आरोपींना जामिन मिळवून देण्यासाठी बोगस दस्तावेज दिले आहेत. या आरोपीसह त्यांच्या नातेवाईकांकडून किती रुपये घेतले होते. या गुन्ह्यांत त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र साळुुंखे यांनी सांगितले.