मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस रेल्वे स्थानकात आरडीएक्स ठेवल्याचा कॉल करुन संपूर्ण पोलीस यंत्रणेला कामाला लावणार्या पवनकुमार नावाच्या एका आरोपीस रेल्वे पोलिसांनी अटक केली. पवनकुमार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याने बॉम्ब असल्याचे बोगस कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याला शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सागितले.
स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. विशेषता शहरातील प्रमुख रेल्वे स्थानकातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे पोलीस ठाण्यात कॉल करुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आरडीएक्स ठेवल्याची माहिती दिली होती. या कॉलची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संपूर्ण रेल्वे स्थानक आणि आसपासचा परिसरात तपासणी सुरु केली होती. मात्र पोलिसांना कुठेही आक्षेपार्ह वस्तू किंवा आरडीएक्स सापडले नाही. तो बोगस कॉल असल्याचे उघडकीस येताच सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मोरे, उपनिरीक्षक सांगळे, गुन्हे शाखेचे आणि एसटीएफच्या पथकाने आरोपींचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने तांत्रिक माहितीवरुन रेल्वे स्थानक परिसरातून पवनकुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्यानेच आरडीएक्स ठेवल्याचा बोगस कॉल केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली. पवनकुमार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत तो जामिनावर बाहेर आला होता. कॉल करण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा आता पोलीस तपास करत आहेत.