महाकुंभच्या नावाने बोगस वेबसाईट बनवून नव्या घोटाळ्याच्या पर्दाफाश
हेलिकॉप्टर राईटची सर्व्हिसच्या बहाण्याने गंडा घालणार्या पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2025
मुंबई, – महाकुंभ मेळाव्याच्या नावाने बोगस वेबसाईट बनवून हेलिकॉप्टर राईटची सेवा देण्याचा बहाणा करुन गंडा घालणार्या एका बिहारच्या नवीन घोटाळ्याचा कफ परेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुकेशकुमार ब्रिजेशकुमार, सौरभकुमार रमेशकुमार, अविनाशकुमार कमलेशकुमार ऊर्फ बिट्टू, सुष्टी प्रदीपकुमार बर्नावल आणि संजितकुमार शैलंदर मिस्त्री अशी या पाचजणांची नावे आहेत. यातील सृष्टी ही अंधेरीतील आक्सा मशिदीसमोरील जुहू गल्ली तर उर्वरित चारही आरोपी बिहारच्या नालंदाचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्ररदार महिला ही कुलाबा येथे राहत असून तिला तिच्या कुटुंबियांसोबत महाकुंभ मेळाव्यासाठी जायचे होते. त्यासाठी तिला हेलिकॉप्टर राईट करायची होती. त्यासाठी तिने सोशल मिडीयावर सर्च केले असता तिला एका वेबसाईटची माहिती दिसून आली. या वेबसाईटवर एक मोबाईल क्रमांक होता. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर समोरील व्यक्तीने तिला हेलिकॉप्टर सेवा देण्याचे आश्वासन देताना 26 जणांना सवलतीसह 60 हजार 652 रुपये होतील असे सांगितले. त्यासाठी तिला आधी पेमेंट करुन बुकींग करावे लागेल असे सांगितले होते. त्यामुळे तिने 60 हजार 652 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले होते. मात्र ही रक्कम पवन हंस या सरकारी कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर न होताा सोनामुनी देवी या महिलेच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाले होते.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने दुसर्या दिवशी पुन्हा संबंधित वेबसाईटची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिला ती वेबसाईट दिसून आली नाही. त्यामुळे तिने संबंधित व्यक्तीला कॉल करुन विचारणा केली आणि तिच्या पैशांची मागणी केली होती. मात्र या व्यक्तीने तिला प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने तिचा मोबाईल ब्लॉक केला होता. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने कुलाबा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. महाकुंभ मेळाव्याच्या नावाने झालेल्या या फसवणुकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत कुलाबा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकिरण काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयदीप गायकवाड, सायबरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमीत देवकर, पोलीस उपनिरीक्षक रुपेशकुमार भागवत, प्रविण रणदिवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे, पोलीस हवालदार राठोड, तांडेल, पाटील, सचिन पाटील, पोलीस शिपाई ताटे, काकडे, यादव, देशमुख, महिला पोलीस शिपाई गुंजाळ यांनी तपास सुरु केला होता. तपासात फसवणुकीची रक्कम बिहारच्या विविध एटीएम सेंटरमधून काढण्यात आली होती. त्यामुळे एटीएमचे सीसीटिव्ही फुटेज प्राप्त करुन पोलिसांनी आरोपीचे फोटो घेतले होते. याच फोटोवरुन अविनाशकुमारला बिहारहून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर त्याच्या इतर चार सहकार्यांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली.
तपासात मुकेशकुमार हा या टोळीचा म्होरक्या असून त्याने तक्रारदार महिलेशी संभाषण केले होते. अविनाशकुमारने महाकुंभ मेळाव्यासाठी हेलिकॉप्टर राईट सेवा देणारी बोगस वेबसाईट बनविली होती. तसेच त्याच्यासह सृष्टी, संजीतकुमार यांनी एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचे तसेच फसवणुकीसह सिमकार्डसह इतर तांत्रिक मदत केल्याचे उघडकीस आले. मुकेशकुमारसह सौरभ हादेखील लोकांशी संभाषण करत होता. त्यानेही तक्रारदार महिलेला संपर्क साधला होता. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. मुंबईसह इतर राज्यात ही बिहारी टोळी कार्यरत असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.