नौदलाच्या संत्री चौकातून रायफलसह मॅगझीन चोरीस गेल्याने खळबळ
अज्ञात अग्निविराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 सप्टेंबर 2025
मुंबई, – दक्षिण मुंबईतील अत्यंत संवेदनशील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या नौदलाच्या संत्री चौकातून रायफलसह मॅगझीन चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात अज्ञात अग्निविराविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान या घटनेची नौदलाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत या संपूर्ण घटनेची चौकशीचे आदेश जारी केले आहेत.
दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात नौदलाची संत्री चौकी असून हा संपूर्ण परिसरात अत्यंत संवेदनशील प्रतिबंधित क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तिथे सर्वसामन्यांना प्रवेश मिळत नाही. गेल्या आठवड्यात या चौकात एक अग्निवीर कर्तव्य बजावत होता. काही वेळानंतर तिथे दुसरा अग्निवीर आला आणि त्याने तो त्याचा रिलिव्हर असल्याचे सांगून त्याच्याकडून रायफल, मॅगझीनसह इतर साहित्य घेतले होते. काही वेळानंतर तो तेथून रायफल, मॅगझीन घेऊन निघून गेला होता. हा प्रकार नंतर दुसरा अग्निवीर आल्यानंतर उघडकीस आला होता. अज्ञात व्यक्तीने तो अग्निवीर असल्याची बतावणी करुन तो रिलीव्हर असल्याची बतावणी करुन ही रायफल आणि मॅगझीन घेऊन पलायन केले होते.
ही माहिती नंतर संबंधितांकडून त्यांच्या वरिष्ठांना देण्यात आली होती. या घटनेनंतर नौदल अधिकार्यांनी संबंधित आरोपींचा शोध सुरु केला होता. मात्र बराच वेळ शोध घेतल्यांतर आरोपीला पकडण्यात यश आले नाही. तो तेथून रायफलसह मॅगझीन घेऊन पळून गेला होता. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर ही माहिती कफ परेड पोलिसांना देण्यात आली होती. याबाबत तक्रार प्राप्त होताच सोमवारी रात्री उशिरा कफ परेड पोलिसांनी अज्ञात अग्निविराविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
या घटनेची पोलीस आयुक्त देवेन भारती यांनीही गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.