मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ एप्रिल २०२४
मुंबई, – कफ परेड येथे एका २३ वर्षांच्या तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नितू मुकेश वाल्मिकी असे या तरुणीचे नाव असून तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा मित्र विकी सेल्वम नायडू (२५) याला कफ परेड पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.
मुकेश केशव वाल्मिकी हे त्यांची पत्नी आणि पाच मुलांसोबत कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गल्ली क्रमांक ३३ मध्ये राहतात. ते सफाई कामगार असून त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगा काम करतात तर त्यांची मुलगी नितू ही ब्युटीपार्लरमध्ये कामाला आहे. ती सकाळी नऊ वाजता घरातून कामावर जाते आणि रात्री नऊ वाजता घरी येते. शुक्रवारी ५ एप्रिलला ते चर्चगेट येथील मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्याजवळील ठाकूर निवासमध्ये कामावर होते. यावेळी त्यांच्या लहान मुलीने त्यांना फोन करुन नितूने स्वतला गळफास लावून घेतले असून तिला जे. जे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यामुळे ते जे. जे रुग्णालयात गेले होते. तिथे नितूवर उपचार सुरु होते. चौकशीदरम्यान नितूचे तिचा मित्र विकी नायडूसोबत भांडण झाले होते. या भांडणानंतर त्याने तिच्यावर फावड्याने हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर ती तिच्या भावाकडे गेली आणि तिथे तिने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या घटनेची माहिती मिळताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विकीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. दुसर्या दिवशी नितूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी विकीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कलम वाढविले होते. गुन्हा दाखल होताच विकीला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सघ्या पोलीस कोठडीत आहे. नितूचा पोलिसांनी मोबाईल ताब्यात घेतला असून त्यात नितूचे आत्महत्या करण्यापूर्वी विकीसोबत ५ मिनिट ३२ सेकंद संभाषण झाल्याचे दिसून आले. या संभाषणात त्याने तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हा मोबाईल आणि तिचे व्हाईस रेकॉडिंग क्लिप पोलिसांनी कालिना न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत पाठविले आहे.