मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – बोगस धनादेशाद्वारे एका नामांकित कंपनीच्या बँक खात्यातून सुमारे साडेबारा लाख रुपये काढण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार कफ परेड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कफ परेड पोलिसांनी बोगस धनादेश बनवून संचालकांची खोटी स्वाक्षरी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून कफ परेड पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. बँकेच्या सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
मेहेरनोश एरज बचा हे गिरगाव येथील खेतवाडी परिसरात राहत असून अटलांटिक ग्लोबल शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून काम करतात. या कंपनीचे मुख्य कार्यालय नरिमन पॉईट येथील मित्तल कोर्ट, बी विंगच्या बाराव्या मजल्यावर आहे. २९ जुलै ते २ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत कंपनीचे खाते असलेल्या बँकेत ४९ हजार ६०० रुपये आणि १२ लाख रुपयांचे दोन धनादेश आले होते. ते दोन्ही धनादेश बोगस होते. या बोगस धनादेशावर कंपनीचे अध्यक्ष शब्बीर रंगवाला यांचे खोटी स्वाक्षरी होती. या धनादेशद्वारे अज्ञात व्यक्तीने बँकेतून सुमारे साडेबारा लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच बँकेच्या वतीने ही माहिती मेहेरनोश बचा यांना देण्यात आली होती. या धनादेशाची पाहणी केल्यानंतर ते दोन्ही धनादेश कंपनीचे नसून बोगस होते. त्यावर शब्बीर रंगवाला यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली होती. ही माहिती नंतर वरिष्ठांना देण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन मेहेरनोश बचा यांनी कफ परेड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.