मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – विदेशातून कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी करणार्या टोळीतील एका मुख्य आरोपीस सीमा शुल्क विभागाच्या स्पेशल पोस्टल इन्वेस्टिगेशन ब्रॅचच्या (एसपीआयबी) अधिकार्यांनी अटक केली. अभिनव अतुल चतुर्वैदी असे या ३६ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा गुजरातच्या अहमदाबाद, साबरमती, मोटेराचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कुरिअरच्या माध्यमातून विदेशात ड्रग्ज तस्करीचे प्रमाण वाढल्याने संबंधित तपास यंत्रणेने अशा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. याच प्रकरणात या पथकाने यापूर्वी विदेशातून आलेले पार्सल ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला होता. ही मोहीम सुरु असताना जानेवारी महिन्यांत विदेशातून पोस्ट विभागात एक पार्सल आले होते. या पार्सलबाबत संशय निर्माण झाल्याने एसपीआयबीच्या अधिकार्यांनी संबंधित पार्सलची तपासणी केली होती. यावेळी त्यात १६३६ ग्रॅम वजनाचे एमडीएमच्या गोळ्या सापडल्या होत्या. त्या गोळ्या जप्त केल्यानंतर या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. ते पार्सल कोणी पाठविले होते तसेच ते कोणाच्या नावाने आले होते याचा शोध सुरु असताना या पथकाने एका बोगस पार्सल तयार केले होते. यावेळी पोस्ट विभागात ते पार्सल घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्याने नवी मुंबईतील एका नायजेरीयन व्यक्तीने ते पार्सल आणण्यासाठी सांगितले होते. पार्सल घेतल्यानंतर शर्मा नावाच्या एका व्यक्तीला नवी मुंबईत ते पार्सल देण्याचे ठरले होते. त्यामुळे या पथकाने शर्माला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत त्याला ते पार्सल आणून देण्यासाठी २० हजार रुपयांचे कमिशन मिळणार होते. त्यापैकी दहा हजार रुपये त्याला आधीच पाठविण्यात आले होते. उर्वरित दहा हजार पार्सलच्या डिलीव्हरीनंतर मिळणार होते. या पार्सलमध्ये काय आहे याची त्याल काहीच माहिती नव्हती. चौकशीदरम्यान शर्माला दहा हजार रुपये अभिनव चतुर्वेदी याने पाठविल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या बँक खात्याची माहिती काढून त्याद्वारे त्याचा शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला रविवारी या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ते पार्सल विदेशात मागविल्याचे उघडकीस आले होते. या संपूर्ण कटात सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला या अधिकार्यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.