कस्टम साहित्य अर्ध्या किंमतीत देण्याच्या आमिषाने फसवणुक
वॉण्टेड असलेल्या मुख्य ठगाला आठ महिन्यानंतर अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – कस्टमने जप्त केलेले महागडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिकसह इतर वस्तू अर्ध्या किंमतीत मिळवनू देतो अशी बतावणी करुन एका व्यक्तीला गंडा घालणार्या ठगाला आठ महिन्यानंतर अटक करण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले आहे. ऑरिस्टारड फर्नाडिस ऊर्फ ऑरिस असे या ठगाचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. ऑरिसने कस्टमच्या नावाने अशाच प्रकारे काही गुन्हे केल्याचे बोलले जाते. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली याचा पोलीस तपास करत आहेत.
मुशीर अहमद खान हे गोरेगाव परिसरात राहत असून ते एअरटेल कंपनीत कामाला आहेत. गेल्या वर्षी त्यांची ऑरिस या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. या ओळखीत त्याने तो कस्टमच्या कार्गो विभागात कामाला असून कस्टमने जप्त केलेले इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईलसह इतर वस्तू अर्ध्या किंमतीत विकतो असे सांगितले होते. यावेळी त्यांच्या परिचित रहिवाशांनी ऑरिस हा विश्वासू माणूस असून त्याला ते गेल्या वीस वर्षांपासून ओळखतात. त्यामुळे त्याच्याकडून त्यांनीही अर्ध्या किंमतीत महागडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक व इतर वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी ऑरिसकडे कस्टमने जप्त केलेल्या काही वस्तू खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी ऍपल कंपनीचा एक आयफोन, मॅकबुक, लॅपटॉप, आयपॅड आणि सॅमसंग कंपनीचा एसी देण्याबाबत विनंती केली होती. त्यासाठी त्यांनी त्याला दिड लाखांचे पेमेंट केले होते. एका दिवसांत त्यांचे बिल तयार होईल आणि ऑर्डर बुक झाल्यानंतर तीन दिवसांत त्यांच्या राहत्या घरी सामानाची डिलीव्हरी होईल असे त्याने सांगितले होते. याच दरम्यान ऑरिसने त्यांना फोन करुन कस्टममध्ये काही लिमिटेड स्टॉक असून ते त्यांना स्वस्तात मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी त्याच्याकडे शिल्लक स्टॉकबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना सॅमसंग फोल्ड मोबाईल, आयफोन १४, सोनी ब्राविआचा टिव्ही, आयपॅड, महागडे विदेशी परफ्युमचे दहा बॉक्स असल्याची एक लिस्ट पाठवून दिली होती. त्यामुळे त्यांनी या सर्व सामानासाठी त्याला आणखीन साडेचार लाख रुपयांचे पेमेंट केले होते.
मात्र तीन दिवसांत त्याने ऑर्डर केलेली कुठलीही वस्तू त्यांच्या घरी पाठविली नव्हती. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. त्याने ऑर्डर डिस्पॅच केलेला मेलदेखील बोगस होता. अशा प्रकारे कस्टमने जप्त केलेले महागडे इलेक्ट्रॉनिक, मोबाईलसह इतर वस्तू अर्ध्या किंमतीत देण्याची बतावणी करुन ऑरिसने त्यांच्याकडून ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सुमारे सहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच डिसेंबर २०२३ रोजी त्यांनी ऑरिसविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात ऑरिसविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुक आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ऑरिस हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला आठ महिन्यानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. चौकशीत त्याने तक्रारदारासह इतर काही लोकांची अशाच प्रकारे फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.