मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 मे 2025
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना बोगस कागदपत्रांच्या आधारे विविध बँकेत खाती पुरविणार्या एका मुख्य आरोपीस वर्सोवा पोलिसांनी अटक केली. ओमप्रकाशसिंह कठीणसिंह ठाकूर असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्यप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल, सिमकार्ड, क्रेडीट-डेबीट कार्ड, पासबुक आणि चेकबुक आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गस्त घालताना संशयावरुन पकडलेल्या ओमप्रकाशसिंहच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.
संदीप निवृत्ती कांबळे हे नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहत असून सध्या वर्सोवा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी ते निर्भया पथक या वाहनावर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांच्यासोबत महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता राठोड, महिला शिपाई वावरे होते. सायंकाळी साडेपाच चवाजता जानकीदेवी पब्लिक स्कूल रोड, ओल्ड म्हाडा, चारबंगला परिसरात गस्त घालताना रस्त्याच्या कडेला चार तरुण उभे होते, पोलिसांची गाडी पाहताच ते सर्वजण पळू लागले. हा प्रकार संशयास्पद वाटताच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यातील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले तर इतर तिघेही पळून गेले होते.
चौकशीअंती त्याचे नाव ओमप्रकाशसिंह असल्याचे उघडकीस आले. तो मध्यप्रदेशच्या जबलपूर, पाटनचा रहिवाशी होता. सध्या तो मिरारोड, कुर्ला, वर्सोवा म्हाडा परिसरातील विविध हॉटेलमध्ये राहत होता. चौकशीत त्याने काही दिवसांपूर्वी त्याची ओळख टेलिग्रामवर जॉन नावाच्या व्यक्तीशी झाली होती. चर्चेदरम्यान जॉन व त्याचे सहकारी ऑनलाईन फसवणुक करणारे सराईत गुन्हेगार असून फसवणुकीसाठी त्यांना बँक खात्याची गरज असल्याने त्याने त्यांना बँकेत बोगस खाती उघडण्याचा सल्ला दिला होता. त्यासाठी जॉनने त्याला विविध सिमकार्ड दिले होते. ते सिमकार्ड तो दोन ते तीन दिवस वापरुन फेंकून देत होता.
जॉनच्या सांगण्यावरुन त्याने विविध बँक खाती उघडली होती. याच बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा होत होती. ही रक्कम काढून तो जॉनला देत होता. त्यासाठी त्याला जमा होणार्या रक्कमेपैकी दहा टक्के कमिशन मिळत होते. पकडले जाऊ नये म्हणून जॉनने त्यांची विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्या नावाने बोगस पॅन, आधारकार्ड बनवून दिले होते. त्याला नवीन सिमकार्ड देण्यासाठी पळून गेलेले तिन्ही आरोपी आले होते.
या कारवाईत त्याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल, विविध कंपनीचे अकरा सिमकार्ड, वेगवेगळ्या नावाचे तीन आधाकार्ड, तीन पॅनकार्ड, एका बाईकचे आरसी बुक कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, विविध बँकेचे 12 डेबीट, क्रेडिट कार्ड, पासबुक, चेकबुक आदी मुद्देमाल जप्त केला आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून देण्यास मदत केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली आहेत. या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ओमप्रकाशसिंह याने उघडलेल्या बँक खात्यात विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांतील कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.