सायबर हेल्पलाईनच्या नावाने फसवणुक करणार्‍या आरोपीस अटक

फसवणुकीची रक्कममिळवून देण्याच्या आमिषाने अनेकांना गंडा

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 जुलै 2025
मुंबई, – सायबर फसवणुक झालेली रक्कम मिळवून देतो असे सांगून 14 सी आणि 1930 या सायबर हेल्पलाईनमधून बोलत असल्याची बतावणी करुन फसवणुक करणार्‍या एका सराईत आरोपीस सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अनिल मधुकर दरेकर असे या 35 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अनिल दरेकरने अशाच प्रकारे महाराष्ट्रातील विविध शहरात अनेकांची फसवणुक केली असून त्याच्या अटकेने अशा काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

काही दिवसांपूर्वी यातील तक्रारदारांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. या व्यक्तीने स्वतचे नाव अनिल दरेकर असल्याचे सांगून तो 14 सी आणि 1930 सायबर हेल्पलाईनमधून बोलत असल्याचे सांगितले होते. त्यांची सायबर गुन्ह्यांतील रक्कम परत मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने भारत सरकार, गृहमंत्रालयासह नॅशनल सायबर क्राईम रिपोटिंग पोर्टल, 14 सी आणि भारतीय राजमुद्रा असलेले अनिल दरेकर या नावाने सायबर लिगल आणि टेक्लिकल असे नमूद केलेले बोगस ओळखपत्र पाठवून तो त्यांची मदत करत असल्याचे भासविले होते. कोर्ट कामासह वकिल फी आणि इतर कामासाठी तो त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अनिल दरेकर याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन अनिल दरेकर याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात त्यानेच तक्रारदारांना कॉल करुन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम परत मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणुक करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. अनिल हा पनवेलच्या विचुंबे, ग्रीन व्हॅली रोड, श्रीगणेश सोसायटीमध्ये राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल, डेबीट कार्ड, भारत सरकार, गृहमंत्रालयाचे नॅशनल सायबर क्राईम रिपोटींग पोर्टल, 14 सी आणि भारतीय राजमुद्रा असलेले बोगस ओळखपत्र जप्त केले आहेत.

प्राथमिक तपासात त्याने अशाच प्रकारे अनेकांना कॉल करुन तो शासकीय अधिकारी असल्याचे सांगून त्यांची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची फसवणुक रक्कम मिळवून देण्यासाठी कोर्ट कामकाजासह फी व इतर कामासाठी पैशांची मागणी केली होती. ही रक्कम तो स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करत होता. त्याने आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अशा अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र शिरतोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मंगेश मजगर, बाळासाहेब कानवडे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार घोरपडे, पोलीस शिपाई अमोल फापाळे, दिपक पडळकर यांनी केली.

नागरिकांना आवाहन-प्रतिबंधात्मक उपाय
14 सी आणि 1930 सायबर हेल्पलाईनकडून अशा प्रकारची माहिती घेतली नाही
14 सी आणि 1930 सायबर हेल्पलाईनमधून बोलणार्‍या व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी करत नाही. त्यामुळे याबाबत खात्री न करता कोणाच्या सांगण्यावरुन ऑनलाईन व्यवहार करु नये
14 सीचा कर्मचारी आणि 1930 सायबर हेल्पलाईन असा व्हॉटअप व इतर सोशल मिडीया प्रोफाईल फोटो असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करुन त्याला प्रत्युत्तर द्यावे.
असा प्रकार निदर्शनास आल्यास त्वरीत जवळच्या पोलीस ठाणे किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क साधून संबंधित व्यक्तीची माहिती द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page