फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्‍या भामट्याला अटक

शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने घातला 79 लाखांना गंडा

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
16 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणार्‍या एका भामट्याला राजस्थान येथून दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. रणजीतसिंह लालसिंग सांखला असे या 29 वर्षीय भामट्याचे नाव असून अटकेनंतर त्याला गिरगाव येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने या टोळीने एका 70 वर्षांच्या वयोवृद्धाची सुमारे 79 लाखांची फसवणुक केली होती. या रक्कमेपैकी 25 लाख रुपये रणजीतसिंगने उघडलेल्या बँक खात्यात जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार मधुकर प्रयाग शुक्ला हे दक्षिण मुंबईतील रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मोबाईल क्रमांक एका शेअरमार्केटशी संबंधित कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये अनेक सभासद होते, त्यात शेअरमार्केटबाबत दैनदिन माहिती देताना कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा होईल याबाबत माहिती दिली जात होती. ग्रुप अ‍ॅडमिनने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी विविध शेअरमध्ये 79 लाख 40 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती.

मात्र कुठलाही परतावा तसेच मूळ रक्कम परत न करता सायबर ठगांनी त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर 14 ऑगस्टला अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवुणकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना फसवणुकीची 25 लाखांची रक्कम रणजीतसिंग सांखला याच्या बँक खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले होते. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व त्यांच्या पथकाने संबंधित खातेदाराचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने राजस्थान येथून रणजीतसिंहला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याची कबुली देताना त्याच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम त्याने सायबर ठगांना दिल्याचे सांगितले. याकामी त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून देण्यात आली होती. रणजीतसिंह हा राजस्थानच्या चित्तोडगड, श्री नहार हाऊसच्या पहिल्या मजल्यावर राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे.

सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविणे त्याला चांगलेच महागात पडले आहे. अटकेनंतर त्याला ट्रान्झिंट रिमांड घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page