फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत करणार्या टोळीचा पर्दाफाश
विविध कंपन्यांच्या नावाने बँकेत बोगस खाती उघडल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2026
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर ठगांना मदत करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. साकिब नवाज सौरभअली खान आणि जमीर अहमद मोहम्मद जावेद अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, विविध बँकेचे चेकबुक, कॅश असा 2 लाख 35 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने विविध कंपन्यांच्या नावाने बँकेत 55 हून बोगस खाती उघडून या खात्याची माहिती सायबर ठगांना पुरविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या काही वर्षांत मुंबईसह देशभरात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. या सायबर ठगांना विविध बँकेचे खाती पुरविणारे काही टोळ्या कार्यरत होत्या. या टोळ्यांकडून सायबर ठगांना बँक खाती पुरविले जात असल्याने फसवणुकीची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा केली जात होती. त्यामुळे सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या टोळ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना अशाच गुन्ह्यांतील काही आरोपी मशिदबदर येथील मांडवी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती युनिट तीनच्या अधिकार्यांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शरद धराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माळी, पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील, सहाय्यक फौजदार अरुण घाटकर, पोलीस हवालदार अशोक पाटील, सुहास कोकणकर, गिरीश मोरे, पोलीस शिपाई मारुती खेडकर, लक्ष्मण दाईंगडे यांनी मांडवीतील एका खाजगी कार्यालयात छापा टाकला होता.
यावेळी तिथे असलेल्या साकिब खान आणि जमीर अन्सारी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यात ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. फसवणुकीसाठी ते सायबर ठगांना विविध बँकेचे खाती पुरविण्याचे काम करत होते. त्यांनी आधारकार्ड आणि पॅनकार्डद्वारे ऑनलाईन एकूण नऊ बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. या कंपन्यांच्या नावाने विविध बँकांमध्ये 55 अधिक खाती उघडले होते. या खात्याची माहिती नंतर सायबर ठगांना दिली जात होती. त्यांनी पुरविलेल्या बँक खात्याचा ऑनलाईन फसवणुकीसाठी वापर केला होता. या बँक खात्याची माहिती जाणून घेतल्यानंतर त्यात कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे दिसून आले आहे.
घटनास्थळाहून पोलिसांनी दहा मोबाईल, तीन लॅपटॉप, दोन पेनड्राईव्ह, विविध बँकांचे चेकबुक, 1 लाख 3 हजार 880 रुपयांची कॅश असा 2 लाख 35 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सायबर ठगांना बँक खाती पुरविणारी एक सराईत टोळी असून त्यांच्या चौकशीतून त्यांच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोघांनाही गुरुवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.