मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीची १ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम वाचविण्यात सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. शेअर ट्रेडिंगच्या नावाने अज्ञात सायबर ठगांनी एका महिलेची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच या महिलेने तातडीने सायबर सेलच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर तिने ट्रान्स्फर केलेली रक्कम संबंधित बँक खात्यात पुन्हा गोठविण्यात आली आहे. या कामगिरीबाबत संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.
तक्रारदार महिला ही चेंबूर परिसरात राहत असून तिची शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केली होती. चांगला परतावा देतो असे सांगून तिला विविध बँक खात्यात २ कोटी ६१ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यात प्रवृत्त करणयात आले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर सेलच्या हेल्पलाईन क्रमांक १९३० क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर या अधिकार्यांनी तातडीने हालचाल करुन एनसीआरपी पोर्टलवर तक्रार केली होती. या पथकाने बँकेच्या नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना घडलेला प्रकार सांगून संबंधित बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या अधिकार्यांनी या बँक खात्यातील व्यवहार थांबवून या खात्यात जमा झालेली रक्कम फ्रिज केली होती.
पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बावस्कर, महिला पोलीस शिपाई बावणे, पोलीस हवालदार राऊळ, महिला पोलीस हवालदार वालावलकर, पोलीस शिपाई पाटील यांनी ही कामगिरी केली. तक्रार प्राप्त होताच फसवणुक झालेल्या २ कोटी ६१ लाखांपैकी १ कोटी २२ लाख रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे तक्रारदार महिलेने सायबर सेल पथकातील अधिकारी आणि कर्मचार्यांचे आभार व्यक्त केले आहे. दरम्यान या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.