सिम स्वॅपच्या माध्यमातून साडेसात कोटीची फसवणुक

तक्रारीनंतर ४ कोटी ६५ लाख रुपये वाचविण्यात यश

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ डिसेंबर २०२४
मुंबई,  – कांदिवलीतील एका खाजगी कंपनीच्या बँक खात्यातून सिम स्वॅपच्या माध्यमातून अज्ञात सायबर ठगांनी प्रवेश करुन सुमारे साडेसात कोटीची रक्कम विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केली, मात्र सायबर हेल्पलाईनवर तक्रार प्राप्त होताच सायबर सेल पोलिसांनी तातडीने कारवाई करुन फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी ४ कोटी ६५ लाख रुपयांची कॅश वाचविण्यात यश मिळविले आहे. ही रक्कम तक्रारदारांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येणार आहे. इतर काही बँक खात्यात उर्वरित रक्कम ट्रान्स्फर झाल्याने ही रक्कम लवकरच संबंधित बँक खात्यात फ्रिज केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांच्या मालकीची एक खाजगी कंपनी आहे. या कंपनीचे कांदिवली परिसरात एक कार्यालय आहेत. कंपनीचे एका नामांकित बँक खात्यात अकाऊंट आहे. सोमवारी त्यांच्या मेलवर एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात त्यांच्या बँक खात्यातून विविध बँक खात्यात सुमारे साडेसात कोटीची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यांनी कुठलाही ऑनलाईन व्यवहार केला नव्हता. तरीही अज्ञात सायबर ठगांनी सिम स्वॅपच्या माध्यमातून त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात अनधिकृतपणे प्रवेश मिळवून ही रक्कम विविध खात्यात ट्रान्स्फर करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर सेलच्या १९३० क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला होता.

तक्रारदार व्यावसायिकाकडून तक्रार प्राप्त होताच सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस हवालदार राऊळ, महिला पोलीस हवालदार वालवलकर, पोलीस शिपाई किरण पाटील यांनी लागलीच एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार करुन संबंधित बँकेच्या नोडल अधिकार्‍यांशी संपर्क साधला होता. त्यांना घडलेला प्रकार सांगून संबंधित बँक खात्यातील व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. त्यानंतर या अधिकार्‍यांनी तातडीने कारवाई करुन संबंधित बँक खात्याचे सर्व व्यवहार थांबविले होते.

अशा प्रकारे अवघ्या चार तासांत ४ कोटी ६० लाख ६० हजार ०४१ रुपये वाचविण्यात पोलिसांना यश आले. उर्वरित रक्कम अन्य काही बँक खात्यात जमा झाली असून या बँक खात्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. या खात्यातील सर्व व्यवहार थांबवून ती रक्कम फ्रिज केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणुकीची साडेसात कोटीपैकी ४.६५ कोटीची रक्कम अवघ्या चार तासांत वाचविण्यात आल्याने तक्रारदार व्यावसायिकाने सायबर सेल पोलिसांचे आभार व्यक्त केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस हवालदार राऊळ, महिला पोलीस हवालदार वालवलकर, पोलीस शिपाई किरण पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page