कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करुन ऑनलाईन गंडा

मुख्य आरोपीसह सहाजणांच्या टोळीस अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
10 जुलै 2025
मुंबई, – कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करुन केलेल्या मॅसेजमध्ये विविध बँक खात्यात 1 कोटी 96 लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन ऑनलाईन गंडा घालणार्‍या एका टोळीचा सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत वेगवेगळ्या परिसरातून मुख्य आरोपीसह सहाजणांना पोलिसांनी अटक केली. शुभम बाजीराव कुंजीर, अक्षय गोरख शेळके, उज्जवलराज अवधेशकुमार सिंह, शुभकुमार जयपालसिंह परदेशी ऊर्फ राजपूत आणि आदित्य दिलीप शिंदे ऊर्फ लुसिफर आणि आयर्न शिवपाल मिश्रा ऊर्फ सिंचन नोहरा ऊर्फ आरु अशी या सहाजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी 28 मोबाईल, एक लॅपटॉप, सोळा विविध मोबाईल कंपनीचे सिमकार्ड, विविध बँक खात्याचे तेरा चेकबुक आणि आठ डेबीट कार्ड तसेच आयर्नकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. अटकेनंतर या सर्वांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार एका खाजगी नामांकित कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. 12 एप्रिल ते 15 एप्रिल 2025 या कालावधीत ते त्यांच्या कंपनीत काम करत होते. यावेळी त्यांना एका व्हॉटअप क्रमांकावरुन मॅसेज आला होता. या व्हॉटअपच्या डिपीमध्ये त्यांच्या कंपनीच्या संचालकाचा फोटो होता. त्याने तो कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून त्याने दिलेल्या बँक खात्यात काही रक्कम पाठविण्यास सांगितले होते. मॅसेज करणारा कंपनीचा संचालक समजून त्यांनी दिलेल्या बँक खात्यात 1 कोटी 96 लाख 6 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्याने संचालकांना फोन करुन ही माहिती दिली होती. यावेळी संचालकांनी त्यांना कुठलाही मॅसेज केला नाही किंवा त्यांना कुठल्या बँक खात्यात पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले नाही असे सांगितले.

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार सायबर सेल पोलिसांना सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून सहा आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यानंतर या सर्वांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप, बँकेचे धनादेश, डेबीट कार्ड आदी मुद्देमाल जप्त केला.

शुभम हा पुण्याचा रहिवाशी तर बेनिफिशरी बँक खातेधारक आहे. अक्षय हा नाशिकचा रहिवाशी असून त्याने त्याला मदत केली होती. शुभकुमार हादेखील नाशिकचा रहिवाशी असून त्याने तीन आरोपींना मुंबईत बोलावून त्यांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करुन दिली होती. तसेच त्यांच्याकडून बँक खात्याची किट प्राप्त करुन सायबर ठगांना पुरविल्याचा आरोप आहे. आदित्य हा गोवा येथे राहत असून त्याने आयर्नच्या सांगण्यावरुन चार आरोपींना संपूर्ण व्यवहाराची माहिती सांगून बेनिफिशरी खातेदारांची माहिती दिली होती. आयर्न हा उत्तरप्रदेशच्या लखनऊचा रहिवाशी असून त्याने बँक खात्यात जमा झालेली रक्कम त्याच्या विदेशातील चिनी सायबर ठगांना पाठविण्यास मदत केली होती. भारतीय चलन विदेशात करुन क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विदेशात पाठविल्याचा आरोप आहे. या कटातील तो मुख्य आरोपी असून तो काही विदेशी चिनी सायबर ठगांच्या संपर्कात होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page