मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ मार्च २०२४
मुंबई, – पार्ट टाईमच्या नावाने विविध प्रिपेड टास्कद्वारे एका बँक अधिकारी महिलेची सुमारे सात लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन आरोपींना पाच महिन्यानंतर एमएचबी पोलिसांनी अटक केली. सलीम बाबाजान नावालगी आणि मोनेश्वर रामचंद्र सुतार अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
४१ वर्षांची तक्रारदार महिला दहिसर येथे राहत असून ती मालाड येथील एका खाजगी बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यांत ती तिच्या घरी होती. यावेळी तिला व्हॉटअपवर एक मॅसेज आला होता. त्यात फॅनी नावाच्या एका महिलेने तिला डिजीटल मार्केटिंगमध्ये पार्ट टाईम नोकरीची ऑफर देताना तिने कंपनीचे टास्क पूर्ण केल्यास घरबसल्या चांगले कमिशनचे आमिष दाखविले होते. काही वेळानंतर तिने तिला फोन करुन या स्किमची माहिती दिली होती. ही स्किम समजून घेतल्याने तिने तिची ऑफर स्विकारली होती. त्यानंतर तिला इंटाग्रामवर लाईक करुन कमेंट देण्याचे टास्क देण्यात आले होते. तिने ते टास्क पूर्ण केले होते. यावेळी तिला काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. त्यामुळे तिने कंपनीचे इतर टास्क पूर्ण करुन त्यांच्या ग्रुपमध्ये ते स्क्रिनशॉप काढून शेअर केले होते. त्यांना तिला जास्त कमिशनचे आमिष दाखवून काही प्रिपेड टास्कमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या टास्कसाठी तिने सुमारे पावणेसात लाख रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. यावेळी तिला कमिशनची रक्कम तिच्या खात्यात जमा होत असल्याचे दिसत होते, मात्र ही रक्कम तिला तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. याबाबत वारंवार विचारणा करुनही फॅनी, लिनासह इतरांनी तिला प्रतिसाद दिला नाही.
या घटनेनंतर तिने एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या सलीम आणि मोनेश्वर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. फसवणुकीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यामुळे या दोघांनाही अटक करुन नंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते.