मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
29 जुलै 2025
मुंबई, – चांगला परतावा देतो असे सांगून शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका व्यक्तीची 1 कोटी 78 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी सायबर ठगांच्या सहकार्याला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. अजय रमेश मौर्या असे या आरोपीचे नाव असून तो सायबर ठगांना बँक खाती पुरवत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून दिड लाखांच्या कॅशसहीत एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार उत्तर उपनगरात राहतात. मे महिन्यांत त्यांना एका अज्ञात व्यक्तीने एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यांना शेअरमार्केट गुंतवणुकीबाबत पोस्ट दिलेली जाहिरात दिसून आली होती. याच दरम्यान त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये अनेक सभासद होते. या सभासदांनी विविध शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे, त्यात त्यांना चांगला फायदा झाल्याचे भासविण्यात आले होते. याच दरम्यान त्यांनाही अज्ञात व्यक्तीने शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी विविध शेअरमध्ये 1 कोटी 78 लाखांची गुंतवणुक केली होती. मात्र या गुंतवणुकीवर मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम न देता त्यांची फसवणुक झाली होती.
याप्रकरणी उत्तर सायबर सेल पोलिसांत फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर हुंबे, पोलीस उपनिरीक्षक अमोल कांबळे, पोलीस हवालदार नाडगौडा, किरण वसईकर यांनी तपास सुरु केला होता. हा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी अजय मौर्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तो ठाण्यातील वागळे इस्टेट, इंदिरानगर, जय अंबे सोसायटीमध्ये राहतो. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला आहे. तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. या ठगांसाठी त्याच्यासह इतर आरोपींनी विविध बँकेत खाती उघडून दिले होते.
या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. त्याच्या बँक खात्यातील सुमारे दिड लाखांची कॅश पोलिसांनी गोठविली आहे. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.