शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची 1.62 कोटीची फसवणुक

वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक तर इतरांचा शोध सुरु

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
7 ऑगस्ट 2025
मुंबई, – चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगसह गुंतवणुकीच्या नावाखाली एका महिलेची 1 कोटी 62 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी एका मुख्य आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. आशिष थॉमस नवगिरे असे या आरोपीचे नाव असून तो फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याच गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

50 वर्षांची शॅरन सांतान मॅस्करेन्स ही महिला कांदिवली परिसरात राहत असून फ्रिलान्स कन्सलटंट म्हणून काम करते. गेल्या दहा वर्षांपासून ती शेअर ट्रेडिंग करत असून तिला त्याचा चांगला अनुभव आहे. 2 फेब्रुवारीला ती सोशल मिडीयावरील मॅसेज पाहत होती. यावेळी तिला शेअर ट्रेडिंगसंदर्भात एक लिंक दिसून आली. ही लिंक ओपन केल्यानंतर तिला एका व्हॉटअप ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यात आले होते. त्यात 157 सभासद होते, ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगसह गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले जात होते. जवळपास आठवडाभर तिने ग्रुपमध्ये येणार्‍या मॅसेजचा अभ्यास केला होता. त्यातील माहितीची शहानिशा करुन सध्या शेअर मार्केटमध्ये काय अपडेट आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता.

गुगल सर्चदरम्यान ही कंपनीत सेबी रजिस्ट्रर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिला कंपनीविषयी खात्री पटली होती. याच दरम्यान तिला ग्रुप अ‍ॅडमिनने शेअर ट्रेडिंगसह गुंतवणुकीसाठी विनंती केली होती. या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी तिच्याकडून तिची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची माहिती घेण्यात आली होती. कंपनीकडून बरेच मॅसेज आल्यानंतर तिने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. 2 फेब्रवारी ते 14 मार्च 2025 या कालावधीत तिने विविध शेअरसाठी 1 कोटी 42 लाखांची गुंतवणुक केली होती. त्यासाठी तिने कर्ज घेतले होते. या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिने काही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला.

मात्र ही रक्कम तिच्या बँक खात्यात जमा झाली नाही. याबाबत तिने ग्रुप अ‍ॅडमिनकडे विचारणा केली असता त्याने तिला काही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगितले. ही रक्कम ट्रान्स्फर होताच तिची रक्कम तिच्या बँक खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे तिने एकोणीस लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही तिच्या बँक खात्यात तिची रक्कम जमा झाली नव्हती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कंपनीच्या अधिकृत कार्यालयात कॉल करुन ही माहिती सांगितली. यावेळी कंपनीने तिच्या नावाने कंपनीत कुठलेही अकाऊंट नसल्याचे सांगण्यात आले. तिची सायबर फसवणुक झाल्याचे कंपनीच्या कर्मचार्‍याने सांगितले.

हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईनवर तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिने उत्तर प्रादेशिक सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर चार अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना चार महिन्यानंतर आशिष नवगिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. यापूर्वी त्याला अशाच एका गुन्ह्यांत एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम झाल्यानंतर त्याने ती रक्कम सायबर ठगांना दिली होती. त्यासाठी त्याला काही ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page