सायबर ठगांना बँक खातीसह सिम पुरविणारा ठग गजाआड
वांद्रे पोलिसांची कारवाई; सतरा सिमकार्डसह मोबाईल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – विविध ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना बँक खातीसह सिम पुरविणार्या एका ठगाला गजाआड करण्यात वांद्रे पोलिसांना यश आले आहे. गुलाम सरदार असे या ठगाचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. प्रत्येक बँक खात्यामागे त्याला बारा हजार रुपयांचे कमिशन मिळत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी सतरा सिमकार्डसह दोन मोबाईल जप्त केले आहेत.
वयोवृद्ध तक्रारदार महिला वांद्रे येथे राहते. ३० ऑगस्टला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला तिच्या बँकेतून काही मॅसेज प्राप्त झाले होते. त्यात तिच्या बँक खात्यातून १ लाख ४२ हजार रुपये डेबीट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तिने तिच्या बँक खात्याची, पासवर्ड, ओटीपी तसेच इतर कुठलीही माहिती कोणालाही शेअर केली नव्हती. तरीही तिच्या खात्यातून ही रक्कम डेबीट झाली होती. त्यामुळे तिने वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक् शंकर पाटील व त्यांच्या सहकार्यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन गोवंडी येथून या पथकाने गुलाम सरदारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस आला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, ते बँक खाते त्यानेच सायबर ठगांना पुरविल्याचे तपासात उघडकीस आले.
गुलाम हा मूळचा कोलकाताचा रहिवाशी असून तो विविध कामगारांशी मैत्री करुन त्यांच्याकडील कागदपत्रांचा दुरुपयोग करत होता. त्यांच्या कागदपत्रांवरुन विविध बँकेत उघडून त्याची माहिती सायबर ठगांना देत होता. याच बँक खात्यात ऑनलाईन फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केली जात होती. त्यानंतर गुलाम ती रक्कम सायबर ठगांना देत होता. त्यासाठी त्याला ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. त्याने सायबर ठगांना बँक खातीसह काही सिमकार्ड मिळवून दिले होते. त्याने आतापर्यंत सायबर ठगांना किती सिमकार्ड आणि बँक खाती पुरविले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. या गुन्ह्यांत त्याच्या इतर काही सहकार्यांची नावे समोर आली असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.