फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणारा गजाआड
गुंतवणुकीच्या बहाण्याने व्यावसायिकाला 61 लाखांना गंडा घातला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
21 एप्रिल 2025
मुंबई, – फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविणार्या एका आरोपीस शनिवारी उत्तर प्रादेशिक सायबर सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. झकाउल्ला शमीउल्ला सय्यद असे या 31 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्यांत त्याला इतर काही आरोपींनी मदत केल्याचे उघडकीस आले आहे. या टोळीने शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला सुमारे 61 लाखांना गंडा घातला होता, त्यातील काही रक्कम झकाउल्लाच्या बँक खात्यात जमा झाला होता असे पोलिसांनी सांगितले.
सुनिलकुमार सज्जनकुमार मिश्रा हे गोरेगाव येथे राहत असून त्यांचा शेअर ट्रेडिंग व्यवसाय आहे. 22 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने ट्रेडिंग टायटन ऑफ दलाल या व्हॉटअप ग्रुपवर अॅड केले होते. या ग्रुपमध्ये दोनशेहून अधिक सभासद होते. त्यात शेअर गुंतवणुकीबाबत माहितीसह मार्गदर्शन केले जात होते. गु्रपचा अॅडमीन राजीव बत्रा याने त्यांना कॉल करुन शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना या गुंतणुकीवर तीनशे टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांना एक खाते उघडण्यास सांगून त्याने खात्यासंदर्भात एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स अपलोड केली होती. मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड मिळताच त्यांचे नाव रजिस्टर झाले होते. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते.
23 डिसेंबर 2024 ते 10 जानेवारी 2025 रोजी त्यांनी विविध शेअरसाठी 61 लाख 31 हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना त्यांच्या शेअरमध्ये चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या कस्टमर सपोर्ट व्हॉटअप क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी संंबंधित व्यक्तीने त्यांना ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यांना आधी 21 टक्के रक्कम टॅक्स म्हणून भरावी लागेल असे सांगितले. मात्र त्यांनी ही रक्कम जमा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार संपर्क साधून तसेच तक्रार करुनही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच सुनिलकुमार मिश्रा यांनी सायबल हेल्पलाईनसह उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी झकाउल्ला सय्यद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. ही रक्कम त्याने संबंधित सायबर ठगांना दिली होती. याकामी त्याला काही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते.
फसवणुकीसाठी त्याने सायबर ठगांना विविध बँकेत खाते उघडून दिले होते. याच बँक खात्यात नंतर फसवणुकीची रक्कम जमा झाली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर शनिवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नाव समोर आले आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.